स्पर्धा परीक्षांचा क्लास लावण्यापूर्वी- प्रकरण 2

(अतुल लांडे, पुणे) स्पर्धा परीक्षांचा (UPSC / MPSC) अभ्यास करायचे ठरविल्यावर पुढचा महत्वाचा निर्णय असतो--- क्लास कोणता लावावा.

Updated: May 14, 2016, 02:27 PM IST
स्पर्धा परीक्षांचा क्लास लावण्यापूर्वी- प्रकरण 2 title=

पुणे : (अतुल लांडे, पुणे) स्पर्धा परीक्षांचा (UPSC / MPSC) अभ्यास करायचे ठरविल्यावर पुढचा महत्वाचा निर्णय असतो--- क्लास कोणता लावावा.

सध्या क्लासेस ची संख्या जशी वाढत आहे, तसे विद्यार्थी आणि पालकांचा गोंधळही वाढत आहे.

माझा तुम्हाला सल्ला आहे... हा महत्वाचा निर्णय स्वतः घेऊ नका. तुमच्या आधी ज्यांनी हि परीक्षा दिली आहे वा क्लासेस केले आहेत, त्यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करा.

तुमच्या आयुष्याचा आणि पैशांचा प्रश्न आहे, त्यामुळे गडबड न करत सगळ्या क्लासेसला भेट द्या आणि मगच निर्णय घ्या....

आपण क्लास का लावत आहोत याचे निश्चित भान विद्यार्थी आणि पालकांना असणे गरजेचे आहे. कोणताही क्लास लावताना खालील बाबी लक्षात घेणे गरजेचे आहे.....

१. निकालामागचे गौडबंगाल....... ( यासाठी या लिंकवर क्लिक करा ).

 

२. शिक्षक.....
क्लास का लावायचा असतो? शिकण्यासाठी.... शिकवते कोण? शिक्षक... त्यामुळे क्लास लावायचा असेल तर सगळ्यात मह्त्वाची कोणती बाब बघावी? शिक्षक कोण आहेत....

सामान्यतः क्लासेस मध्ये तुम्हाला खालील भूमिका पार पडणाऱ्या व्यक्ती भेटलीत...

अ. संचालक / क्लासप्रमुख- विद्यार्थ्यांना स्फूर्ती देणे, अभ्यासक्रमावर लक्ष ठेवणे, नियोजनात मदत करणे इ. याचबरोबर क्लास वा संस्थेच्या व्यावसायिक आणि प्रशासकीय बाजू बघणे
ब. समुपदेशक- क्लासला भेट देणाऱ्यांना क्लास व बॅचेस ची माहिती देणे
क. स्पर्धा परीक्षा प्रचारक- कार्यशाळा वा जाहीर व्याख्याने घेऊन नागरी सेवा हे करिअर कसे चांगले आहे याचा प्रसार करणे (अर्थात क्लासचा प्रचार करणे )
ड. लेखक- स्पर्धा परीक्षेशी संबंधीत लेखन करणे
इ. शिकवणे

शिक्षकांनी वरील पहिल्या चार भूमिका पार पाडायला काहीच हरकत नाही, ते महत्त्वाचे कार्य आहे पण त्यांचे प्रमुख काम ‘शिकवणे’ आहे हे लक्षात घेतले पाहिजे. बरेचसे विद्यार्थी – पालक पहिल्या चार भूमिका पार पाडणाऱ्यांना शिक्षक समजतात आणि फसतात.
क्लासमध्ये तुम्हाला नक्की कोण शिकवणार आहे हे विचारा. बऱ्याच वेळेला ज्या व्यक्तीसाठी आपण क्लास लावतो, ती व्यक्ती शिकवतच नसते. शिकवत असेल तर उत्तम पण खात्री करून घ्या --- 

ती व्यक्ती किती लेक्चर घेणार? कोणते विषय शिकवणार?

काही क्लासप्रमुख केवळ स्फुर्ती देणे, नियोजन करून देणे, मानसिक आधार देणे याच गोष्टी करतात. त्याची गरज असतेच, पण तुम्ही विचार करा तुम्ही फक्त त्यासाठीच क्लास लावत आहात का?
खरेतर शिक्षकासाठी कोणता अनुभव असावा हा अवघड प्रश्न आहे. शिक्षकांकडे UPSC वा MPSC च्या परीक्षांचा अनुभव पाठीशी असणे गरजेचे आहे, कमीत कमी मुख्य परीक्षा तरी त्यांनी दिलेली असावी.

एकही पूर्व परीक्षा पास न होणारा शिक्षक तुम्हाला चालेल का?

काही शिक्षक एकाच वेळेस बऱ्याच ठिकाणी शिकवतात. तसे असेल तर विद्यार्थ्याकडे ते व्यक्तिगत लक्ष देऊ शकत नाहीत.
काही ठिकाणी एकच व्यक्ती सामान्य अध्ययनाचे सगळेच विषय शिकवतात किंवा एकापेक्षा जास्त वैकल्पिक विषय शिकवतात. खरे तर हे हास्यास्पद आहे.
काही वेळेला तो शिक्षक त्या विषयात निपुण नसतो. स्वतः त्या विषयाचा पहिल्यांदा अभ्यास करत करत शिकवणारे शिक्षक सुद्धा असतात.
वर्षभर त्याच शिक्षकांनी शिकवणे अपेक्षित आहे. मधेच शिक्षक बदलले तर त्याचा तुमच्या अभ्यासावर वाईट परिणाम होऊ शकतो.

काहीवेळेला “मागील यशस्वी अधिकारी शिकवणार” अशी आकर्षक जाहिरात केली जाते. 

पूर्वीच्या यशस्वी विद्यार्थ्यांनी नवीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन जरूर करावे, पण ते संपूर्ण बॅच घेणार आहेत का याची खात्री करावी कारण त्यांच्याकडे वर्षभर बॅच घेण्यासाठी वेळ नसतो.

शिक्षक तुम्हाला गरज असेल तेव्हा उपलब्ध असणार आहेत का याची खात्री करून घ्या.

'क्लास लावण्यापूर्वी "खरा शिक्षक' कोण आहे? हे जाणून घ्या. . तुम्हाला जे शिक्षक प्रत्यक्ष शिकवणार आहेत त्यांना भेटा आणि तुमची खात्री करून घ्या.'