अमित जोशी
झी २४ तास
शीएमनं डोंबिवलीला मेट्रो दिली नाही, कल्याणला दिली यावर जोरदार चर्चा सुरु आहे, लोकं बोंब मारत आहेत. डोंबिवलीला मेट्रो न देण्यामागे काही कारणे असावीत असे वाटते.
- डोंबिवलीजवळ रेल्वे मार्गावर दुसरा उड्डाण पूल प्रस्तावित आहे. हा उड्डाणपूल जेमतेम (यासाठी खूप चांगला असंसदीय शब्द आहे) 250 मीटरचा आहे. तो अजून बांधून पूर्ण होत नाही, असं असताना डोंबिवलीतून जाणारी 5 - 6 किमी (काल्पनिक अंतर समजा) लांबीची मेट्रो डोबिवलीकर बांधून देतील का? असा रास्त प्रश्न शीएम साहेबांना पडला असावा.
- सत्तेतील चेहरे बदलले तरी वाहतुकीच्या बाबतीत डोंबिवलीची दुर्दशा कायम आहे. इच्छाशक्ति नाही. स्टेशन परिसर रिक्षा चालक आणि फेरीवाले यांना विकला गेलेला आहे. हे प्रश्न अजून सुटलेले नाहीत. दाटीवाटीने वसलेल्या या डोंबिवलीमध्ये मेट्रो बांधताना येणारे अडथळे डोंबिवलीकर सो़डवतील का? दूर करतील का? असा प्रश्न शीएम साहेबांना पडला असावा.
- डोंबिवलीमधून लोकलले प्रवास करणारे प्रवासी जास्त आहेत हे अनेकदा आकडेवारीनुसार सिद्ध झालेले आहे. तरीही डोंबिवलीच्या बाबतीत नवीन लोकल वगैरे अशा सुधारणा काही झाल्या नाहीत. डोंबिवलीच्या तुलनेत लोकसंख्येच्या बाबतीत कितीतरी कमी लोकसंख्या असलेल्या दिवावासियांनी त्यांचा प्रश्न काही प्रमाणात नक्कीच सोडवला. डोंबिवलीकरांमध्ये ती धमक नाही. तेव्हा अशी धमक नाही तेव्हा मेट्रो का द्यायची? असा प्रश्न शीएम साहेबांना पडला असावा.
- डोंबिवलीकर स्वतःला फार सुसंस्कृत समजतात. पांढरपेशा - मध्यमवर्गीय लोकं म्हणे इथे रहातात. दिवसभर बिचारे डोंबिवलीकर बाहेर काम करतात आणि रात्र झाली की घरी येतात. त्यांना स्वतःच्या हक्कांची जाण जरुर आहे (नको तेवढी आहे) मात्र नागरी कर्तव्ये असतात ती मात्र विसरलेली आहेत. 'तू हो पुढे... मी येतो' अशी मानसिकता या लोकांची आहे. त्यामुळे या सुसंस्कृत लोकांना दरवेळी गृहीत धरले जाते. अशा लोकांना का मेट्रो द्यायची? असा रास्त प्रश्न शीएम साहेबांना पडला असावा.
- राजकारण कसेही असू द्या मात्र विकास कामांबाबात एकजूट असावी. मात्र सत्तेत इतके वर्ष एकत्र असूनही ही एकजूट कधी दिसली नाही. तर सत्ताधारी यांना धारेवर धरतील एवढा एकेकाळी कौल मिळूनही विरोधी पक्ष हा सत्ताधारी यांना धारेवर धरु शकला नाही. कारणे काहीही असोत विकासकामांबाबत एकजूट नसल्यानं डोंबिवलीकर मागे पडले आणि कल्याणकरांचे एक पाऊल पुढे पडले.
- तेव्हा कल्याणकरांची मेट्रो लवकरात लवकर पूर्ण होवो आणि डोंबिवलीकरांचा प्रवासाचा त्रास कमी होण्यासाठी 33 कोटी देवांपैकी कोणत्याही देवाने इथे अवतार घ्यावा, अशीच प्रार्थना करणे आपल्या हाती राहिले आहे.