इस्त्रोच्या स्क्रॅमजेट इंजिन चाचणीचा फायदा

स्क्रॅमजेट इंजिनची चाचणी इस्रोने रविवारी सकाळी यशस्वी केली. इस्रोच्या भविष्यातील मोहिमांच्या दृष्टिने ही घटना अत्यंत महत्त्वाची आहे. 

Updated: Aug 28, 2016, 01:58 PM IST
इस्त्रोच्या स्क्रॅमजेट इंजिन चाचणीचा फायदा title=

अमित जोशी, झी24 तास मुंबई : स्क्रॅमजेट इंजिनची चाचणी इस्रोने रविवारी सकाळी यशस्वी केली. इस्रोच्या भविष्यातील मोहिमांच्या दृष्टिने ही घटना अत्यंत महत्त्वाची आहे. आज इस्रोने RH - 560 या साउंडिंग रॉकेटच्या दुस-या टप्प्यात हे स्क्रेमजेट इंजिन वापरले. सकाळी 6 वाजता या रॉकेटने अवकाशात झेप घेतली. पहिल्या 20 किमी उंचीपर्यंत रॉकेटचा पहिला  टप्पा वापरला गेला आणि तो वेगळा होत समुद्रात कोसळला. तोपर्यंत दुस-या टप्प्यातील स्क्रेमजेट इंजिन सुरु झाले. अवघे पाच सेकंद हे इंजिन सुरु राहिले. मात्र तोपर्यंत ध्वनीच्या सहा पट रॉकेटने वेग घेतला , सुमारे 70 किमी उंची गाठली, काही सेकंद समांतर प्रवास केला आणि चाचणी संपली.

या चाचणीचा फायदा काय ???

पृथ्वीच्या वातावरणाबाहेर पड़तांना कोणत्याही रॉकेटला पहिल्या दोन रॉकेटच्या टप्प्यामध्ये इंधन जाळण्यासाठी oxidizer वाहून न्यावे लागते, ( कारण उंची गाठत असतांना ऑक्सिजन कमी कमी होत गेलेला असतो ). याचा वापर करत इंधन जाळले जाते. इंधनबरोबर oxidizer ही कित्येक टन वजनाचे वाहून न्यावे लागते. यामुळे रॉकेटचे वजन नाहक वाढते, खर्च वाढतो आणि जास्त वजनाचे उपग्रह नेण्यावरही मर्यादा येतात.

मात्र स्क्रेमजेट इंजिन हवेतील ऑक्सिजनचा वापर करत इंधन जाळू शकते. जस जसे उंचीवर जाऊ ऑक्सिजन विरळ होत जातो , मात्र तरीही विरळ हवेतील ऑक्सिजन घेत इंधन जाळण्याची स्क्रेमजेटची क्षमता आहे. यामुळे कित्येक टन वजनाचा oxydizer पहिल्या दोन टप्प्यात वाहून नेण्याची गरजच पडणार नाही. त्यामुळे रॉकेटचे वजन कमी होईलच, मुख्य म्हणजे उपग्रह प्रक्षेपणाचा खर्चही लक्षणीय कमी होईल आणि जास्त वजनाचे उपग्रह वाहून नेता येईल. अवाढव्य खर्चिक अशा अवकाश मोहिमांचा खर्च कमी होणार आहे.

इस्रोने नुकतीच RLV TD म्हणजेच पुर्नवापर करता येणा-या विमानाची / स्वदेशी मिनी स्पेस शटलची चाचणी केली होती. या मधून भविष्यात उपग्रह सोडले जाणार आहेत, भारतीय अंतराळवीर अवकाशात जाणार आहे. भारताच्या या स्पेस शटलमध्ये या scramjet इंजिनचा वापर केला जाणार आहे.

जगात अमेरिका, रशिया, फ्रान्स या देशांकड़े तंत्रज्ञान आहे. मात्र कोणीही रॉकेटमध्ये याचा वापर सुरु केलेला नाही. अमेरिका याबाबातीत अंतिम टप्प्यात आहे. म्हणूनच आजच्या स्क्रॅमजेट इंजिनच्या चाचणीचे महत्व आहे.