www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
सचिन तेंडुलकर... क्रिकेटचा अनभिषिक्त सम्राट... क्रिकेटच्या या देवाचं आता नवं नाव भारतरत्न सचिन तेंडुलकर असं होणार आहे. भारत सरकारकडून मास्टर-ब्लास्टरला भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी मंगळवारी पुरस्कारनं सन्मानित करण्यात येणार आहे.
सचिन रमेश तेंडुलकर... क्रिकेटचा देव... विक्रमांचा महामेरु....रनमशिन....अशी एक ना अनेक नावं मास्टर-ब्लास्टरची. आपल्या असामान्य बॅटिंगनं त्यानं अवघ्या क्रिकेटजगताला वेड लावलं. मात्र, सचिननं क्रिकेटला अलविदा केला आणि त्याच्या २४ वर्षांच्या सोनेरी करिअरला ब्रेक लागला. १६ नोव्हेंबर २०१३मध्ये क्रिकेटप्रेमींना अखेरच्यावेळी सचिन क्रिकेटच्या मैदानावर दिसला. यानंतर सचिन पुन्हा कधीच बॅटिंगला येणार नाही याची कल्पनाही क्रिकेटप्रेमींना करता येत नव्हती.
मात्र, सचिननं क्रिकेटमधून एक्झिट घेतली आणि क्रिकेट चाहत्यांमध्ये निराशा पसरली. याचदरम्यान, सचिनच्या निवृत्तीचा दिवस मास्टर-ब्लास्टरच्या चाहत्यांसाठी थोडी खुशी थोडा गम देणारा ठरला. एकीकडे सचिन पुन्हा क्रिकेट खेळणार नाही यामुळं क्रिकेट फॅन्स दु:खी होते. तर दुसरीकडे त्याच दिवशी सचिनला देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेला भारतरत्न जाहीर केला आणि क्रिकेट फॅन्सच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य आलं. सचिनला भारतरत्न मिळणार की, हॉकीचे जादूगार ध्यानचंद यांना याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष होतं. अखेर सचिनच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. सचिनच्या सेंडॉफचं हे परफेक्ट गिफ्ट होतं.
२४ वर्ष ज्या क्रिकेटरनं केवळ चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण केल्या. तो क्रिकेटर भारतरत्नसाठी योग्यच असल्याच्या प्रतिक्रिया भारतीयांनी व्यक्त केल्या. भारतरत्न पटकावणारा तो पहिला खेळाडू ठरला. आतापर्यंत समाजसेवा, कला, साहित्य, विज्ञान, तंत्रज्ञान, कारखानदारी आणि सनदी सेवा बजावलेल्या व्यक्तींना या पुरस्कारानं गौरविण्यात येत होतं. मात्र,या निवड प्रक्रियेत बदल करण्यात आला. अतुलनिय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींनाही आता हा पुरस्कार देण्यात येऊ शकतो. हा बदल झाल्यानंतर लगेचच सचिन तेंडुलकराला भारतरत्न देण्याचा निर्णय घेण्यात आला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० सेंच्युरीज झळकावणारा तो एकमेव क्रिकेटर तर आहेच. शिवाय वन-डे क्रिकेटमधील पहिली डबल सेंच्युरीही त्याच्याच नावावर आहे. क्रिकेटमधील जवळपास साऱ्याच विक्रमांना त्यानं गवसणी घातली. या अतुलनिय कामगिरीमुळंच भारत सरकारनंही देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन त्याला एक प्रकारे कुर्निसातच केला.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.