www.24taas.com, झी मीडिया, वसई
वसई तालुक्यातल्या दरपाळे (नायगाव) नावाच्या लहानशा गावात वाढलेला मुलगा `यूएई` संघातून खेळतोय... हे ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा सुखद धक्का बसेल.
स्वप्नील पाटील या २८ वर्षीय तरुणानं ही गोष्ट खरी करून दाखवलीय. स्वप्नील सध्या बांग्लादेश इथं सुरु असलेल्या टी-ट्वेन्टी वर्ल्डकप स्पर्धेत संयुक्त अरब आमिरात (यूएई) संघाकडून खेळतोय. पहिल्याच सामन्यात त्याने दोन चौकारांसहीत २३ धावांची खेळी करून दाखवलीय.
दरपाळे इथं लहानाचा मोठा झालेला स्वप्नील वसईच्या न्यू इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी... वडील प्रकाश पाटील यांच्याकडून क्रिकेटचे धडे गिरवल्यानंतर स्वप्निलने वसईतील शालेय क्रिकेट गाजवण्यास सुरुवात केली. या कामगिरीच्या जोरावरच स्वप्नीलनं मुंबईच्या अंडर १४ संघात स्थान मिळवलं. त्यानंतर अंडर-१९, अंडर-२२ संघातूनदेखील त्याने आपले कौशल्य दाखवलंय. दोन वेळा रणजी वरिष्ठ मुंबई संघात संभाव्य खेळाडू म्हणून निवड झाली तरी अंतिम संघात खेळण्याची संधी मात्र हुकली.
वयाच्या सोळाव्या वर्षी भारत सरकारतर्फे `स्पोर्ट्स पर्सन ऑन स्कॉलरशिप`द्वारे मुंबईतील युनियन बँक ऑफ इंडिया संघात प्रवेश केला. या वेळी स्वप्निलने `टाइम्स शिल्ड` खेळणारा सर्वांत लहान खेळाडू म्हणून मान मिळवला. त्याचबरोबर मुंबई कोल्टससारख्या नावाजलेल्या संघातूनदेखील स्वप्निलने आपली चमक दाखवली.
वेंगसरकर क्रिकेट अकादमी, एमआयजी क्लबमध्ये खेळलेल्या स्वप्निलला वासू परांजपे, विलास गोडबोले यांसारख्या ज्येष्ठ व अनुभवी प्रशिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. दुबईतील `योगी ग्रुप` क्रिकेट संघाला गुणवान क्रिकेटपटूंची गरज असताना त्यांनी एमसीएच्या (मुंबई क्रिकेट असोसिएशन) स्थानिक क्रिकेट सामन्याचे काही व्हिडिओ पाहिले. त्यात यष्टीरक्षक फलंदाजासाठी योग्य खेळाडू म्हणून त्यांनी स्वप्निलची निवड केली... आणि त्याला दुबईला जाण्याची संधी मिळाली. स्वप्निलनं त्याला मिळालेल्या या संधीचं अक्षरश: सोनं केलं.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.