दुनिया वही, सोच नई....(अनुभव)

परवा लोकल पकडली रात्री 11.28ची परळहून... आधीच उशीर झाल्यानं आलेला कंटाळा, त्यात नशिबाने गाडीला गर्दी कमी... बसल्या बसल्या डोळा लागला... ठाण्याच्या आधी जाग आली ती गाडीत चित्रांची पुस्तक विकायला येणा-या एका मुलाच्या आवाजानं..20 रुपयाला एक असं ते चित्रांचं पुस्तक तो विकत होता.. 50 रुपयांना 3 पुस्तक देणार, असंही सांगत होता..

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Nov 1, 2013, 08:31 PM IST

.
प्रसंग पहिला
नाईट शिफ्टसाठी घरातनं निघालो.. घरी कुणीही नव्हतं.. जेवायला एका हॉटेलात गेलो..
स्वाभाविक रात्री 9-9.30 ची वेळ असल्यानं हॉटेलात गर्दी होती.. कुठे बसायचं.. हे ठरवत असताना एका टेबलावर एक आंधळा मुलगा जेवताना दिसला..
त्याचे कपडे फाटके होते.. थोडेसे मळलेलेही होते..
एवढ्या चांगल्या हॉटेलात तो एकटाच न शोभणारा असा दिसत होता..
त्याच्या शेजारच्याच टेबलावर जेवायला बसलो.. माझ्या आजूबाजूच्या चार टेबलांवरील
माणसांचं लक्ष त्या आंधळ्या माणसाकडं होतं. त्याच्या पुढ्यात भात होता,
त्यात ओतलेलं वरण त्याला दिसत नव्हतं. त्याला पाणी देणारा वेटर त्याला
तो भात कालव असा आग्रह करीत होता. पण त्या बिचा-याला त्याची कल्पनाही नव्हती..
माझ्या समोरच्या टेबलावर बसलेला एक माणूस जेवताना त्या आंधळ्याकडं बघत होता.
वेटरला बोलवून आपल्या ताटातलं दही आणि स्वीट त्यानं त्या आंधळ्याला द्यायला लावलं.
माझंही जेवण आटोपत आलं होतं. तेवढ्यात त्या आंधळ्या माणसांचही जेवण संपलं. तो उठला..

काउंटरला गेला, तर आलेलं बील भरायला त्याच्या खिशात पैसेच नव्हते. त्यानं त्याचे सगळे खिसे तपासले. मात्र त्याच्या खिशात पैसेच नव्हते.. हॉटेल मालकानं एका शब्दानंही न हटकता त्याला जाऊ दिलं. मी बील द्यायला काउंटरवर गेल्यावर शंभराची नोट दिली.. आणि त्या आंधळ्या मुलाचे पैसेही माझ्या बीलाबरोबर घ्या असा आग्रह केला. मात्र हॉटेलमालकानं मला नकार दिला. असे रोजच येतात हेही त्यानं मला सांगितलं.. त्याच्यासोबत आलेल्या माणसानं त्या आंधळ्याला हॉटेलात सोडताना त्याच्या खिशातील 20 रुपयांची नोट पळवल्याचंही त्यानं सांगितलं. तो पैसे पळविणारा एका बाजूला, तर त्याला भात कालवण्याचा आग्रह धरणारा वेटर, दही देणारा ग्राहक, बील न घेणारा हॉटेलमालक आणि त्याचं बील भरू इच्छिणारा मी, असे दुस-या बाजूला होतो. आम्ही कुणीच कुणाला ओळखत नव्हतो.. यापुढे भेटण्याची शक्यताही नव्हती.. पण हॉटेलमालकाच्या या सांगण्याने माझे डोळे भरुन आले.. जगात चांगुलपणा नाही अशी ओरड सगळीकडे होत असताना कोणीही बडेजाव न मिरवता सहज त्या आंधळ्याला पोटभर मिळावं यासाठी प्रयत्न करीत होतो.. यात दयाही नव्हती.. एक माणूस म्हणून दुस-या माणसाबद्दल वाटणारा जिव्हाळा होता.. एरवी त्या हॉटेलमालकाच्या गब्बरपणामुळे त्याच्याबद्दल वाटणारा एक आतला संताप क्षणात नष्ट झाला. त्याला आशीर्वाद द्यावेसे वाटले, ते दिलेही.. पण मनातल्या मनात.. मी काहीही केलं नव्हतं.. मी पैसेही दिले नव्हते..पण आत कुठेतरी खूप समाधानानं मी स्टेशनवर गाडी पकडायला आलो.

प्रसंग दुसरा..
परवा लोकल पकडली रात्री 11.28ची परळहून... आधीच उशीर झाल्यानं आलेला कंटाळा, त्यात नशिबाने गाडीला गर्दी कमी... बसल्या बसल्या डोळा लागला... ठाण्याच्या आधी जाग आली ती गाडीत चित्रांची पुस्तक विकायला येणा-या एका मुलाच्या आवाजानं..20 रुपयाला एक असं ते चित्रांचं पुस्तक तो विकत होता.. 50 रुपयांना 3 पुस्तक देणार, असंही सांगत होता.. आता गाडीत मोजकीच मंडळी होती.. म्हणजे तसं नेहमीच ही मुलं गाडीत रात्री उशिरा अशी पुस्तक विकण्यास येतात... अगदी 8-10 वर्षांची गरीब परिस्थितीतली मुलं.. आग्रह करतात नेहमी पुस्तकं घेण्याचा.. माझ्या बाजूच्या सीटवर दोन मित्र बसले होते.. दोघेही दारु पिऊन आलेले..त्यांच्या एकमेकांशी गप्पा चाललेल्या...त्यातल्या एकानं त्या मुलाला बोलावलं, समोरच्या सीटवर बसायला सांगितलं..आणि त्याच्याकडची सगळी पुस्तकं काढून तो ती बघायला लागला.. आणि हे असं का, ते तसं का, अशी विचारणाही सातत्यानं करत होता..

20 को क्यू, 15 को क्यू नही..वगैरे वगैरे.. याच्या या प्रश्नांना तो पोरगा उत्तरं देत होता, त्याच्या परिनं.. एरवी ही पुस्तकं 10 रुपयांना गाडीत घेतली जातात.. पण त्या माणसाच्या या अरेरावी वर्तणुकीनं हळूहळू तो डोक्यात जायला लागला.. त्यांच्यातला हा असा संवाद किमान 20 मिनिटे सुरु होता...कळवा गेलं, मुंब्रा गेलं तरी त्या मुलाची आणि त्या पुस्तकांची चिकित्सा संपत नव्हती.. मी खूप शांतपणे हे सगळं बघत होतो..आता यात आपण पडायला हवं असं मनातून वाटायला लागलेलं.. अखेरीस 3 पुस्तकांवर एकमत झालं.. तेवढ्यात त्या इसमाला कुणाचा तरी फोन आला..