झी २४ तास वेब टीम, मुंबई
रसायनशास्त्राचे तज्ज्ञ आणि नोबेल पारितोषिक विजेते वेंकटेश रामकृष्णन, एमपी-३चे जनक डॉ. कार्लहेन्झ ब्रॅन्डेनबर्ग, पैशाच्या ऑनलाईन व्यवहारांना संरक्षण देणारे डेनिस कार्टर, एनपीसीआयएलचे संचालक एस. ए. भारद्वाज आदी विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील मान्यवरांची व्याख्यानांची ‘आयआयटी’च्या टेकफेस्टमध्ये विद्यार्थ्यांना फिस्ट मिळणार आहे.
मुंबईच्या ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’तर्फे (आयआयटी) ६ ते ८ जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या ‘टेकफेस्ट’मध्ये ही व्याख्याने होणार असून ‘टेकफेस्ट’चे यंदा १५वे वर्ष आहे.
विद्यार्थ्यांना संशोधनाला चालना मिळावी, या हेतूने टेकफेस्टचे आयोजन केले जाते. यात मनोरंजनपर ‘ओ-झोन’सारख्या धमाल कार्यशाळांबरोबर विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील मान्यवरांची व्याख्यानमालाही आयोजिण्यात येते. त्यासाठी जगभरातील नामवंतांना आमंत्रित करण्याकडे टेकफेस्टच्या आयोजकांचा प्रयत्न असतो, असे या व्याख्यानमालेचे व्यवस्थापक सत्यप्रणित रेपाका यांनी सांगितले.
या वर्षी व्याख्यानमालेत २००९ सालचे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक विजेते वेंकटरमण रामकृष्णन यांना आमंत्रित करण्यात आले आहे. डॉ. वेंकटरमण हे रॉयल सोसायटीबरोबरच इएमबीओ, अमेरिकेची नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस आणि ट्रिनिटी महाविद्यालय आदी नावाजलेल्या संस्थाशी संबंधित आहेत. २०१० साली त्यांना ‘पद्मविभूषण’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. सध्या ते इंग्लंडच्या केंब्रिज येथील एमआरसी मोलेक्युलर बायोलॉजीच्या प्रयोगशाळेत कार्यरत आहेत.
डॉ. ब्रॅन्डेनबर्ग हे एमपी-३च्या जनकांपैकी एक आहेत. डॉ. ब्रॅन्डेनबर्ग यांच्या नावावर १०० हून अधिक उत्पादकांची पेटंट्स आहेत. ते विद्यार्थ्यांशी ‘डिजिटल मिडियाचे भवितव्य’ या विषयावर संवाद साधतील. सीएसएसचे जनक हाको व्ह्युम ली हे ‘पेजिंग दी वेब पेज आणि सीएसएस’ या विषयावर चर्चा करतील. तर एनपीसीआयएलचे डॉ. भारद्वाज ‘आण्विक तंत्रज्ञानात भारताचे स्थान’ या विषयावर बोलतील. टीटीएक्सजीपी-दी इग्रॅन्ड प्रिक्स या स्पर्धेचे संस्थापक अझर हुसैन, पैशाच्या ऑनलाईन व्यवहारांना सॉफ्टवेअरच्या माध्यमातून संरक्षण मिळवून देणारे डेनिस कार्टर यांचाही या मान्यवरांमध्ये समावेश असेल.