www.24taas.com, झी मीडिया,मुंबई
उन्हाळी सुट्टीनंतर राज्यभरातील शाळा आजपासून सुरू होत आहेत. त्यातच दोन दिवस जोरदार पाऊस कोसळत असल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. तर शाळांमध्ये प्रथमच येणाऱ्या विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत करण्यासाठी सरकारने फूल देऊन स्वागत करण्याच्या सूचना केल्यात. तर काही शाळांत शालेय पोषण आहारात मिष्टान्नाचा बेत आखण्यात आला आहे.
`चला शाळेला` या शाळा प्रवेशोत्सवाच्या कार्यक्रमावर मुंबई, ठाणे पट्ट्यात पावसाचे सावट आहे. येत्या २४ तासात पाऊस कोसळण्याची शक्यता असल्याने कार्यक्रमवापर पावसाचे सावट कायम आहे. उन्हाळी सुटीनंतर मुंबईसह राज्यातील सुमारे एक लाख तीन हजार ६८५ शाळा सोमवारपासून सुरू होत आहेत. काही शाळा गेल्या आठवड्यापासूनच सुरू झाल्या आहेत.
पुस्तके, दप्तर, युनिफॉर्म, रेनकोर्ट आणि वर्गातले नवीन मित्र मैत्रिणींच्या यांच्या सोबतीने आजपासून शाळेचा पहिला दिवस सुरू होईल. शाळा प्रवेशोत्सवाच्या निमित्ताने काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत गुलाबाचे फूल देऊन वाजत गाजत केले जाणार आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी दुपारच्या जेवणात मुलांना काही तरी गोडधोड खाऊ घाला , असे आदेश सरकारने शाळांना दिले आहेत.
शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेत सरपंच, उपसरपंच, जिल्हा परिषदेच्या सदस्य अथवा अधिकाऱ्याने उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे स्वागत करावे. जिल्ह्याचे पालकमंत्री अथवा स्थानिक मंत्री महोदय यांना एखाद्या शाळेत उपस्थित राहण्याची विनंती करण्यात यावी, असे आदेश देण्यात आले आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.