`सहा महिन्यात शिक्षक नेमा; शाळेत सुविधा द्या`

देशभरातील सर्व शाळांमध्ये रिक्त जागांवरील असणारी शिक्षकांची पदे तात्काळ भरण्यात यावीत, असे आदेश केंद्र आणि राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयाने देताना पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृहे या मूलभूत सुविधा सहा महिन्यांच्या आत उपलब्ध करून द्याव्यात, असे बजावले.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Oct 4, 2012, 10:05 AM IST

www.24taas.com,नवी दिल्ली

देशभरातील सर्व शाळांमध्ये रिक्त जागांवरील असणारी शिक्षकांची पदे तात्काळ भरण्यात यावीत, असे आदेश केंद्र आणि राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयाने देताना पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृहे या मूलभूत सुविधा सहा महिन्यांच्या आत उपलब्ध करून द्याव्यात, असे बजावले.

न्यायाधीश के. एस. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हा आदेश दिला. शाळांमध्ये स्वच्छतागृहे बांधण्यासंदर्भात न्यायालयाने यापूर्वी दिलेल्या सर्व निर्देशांची ठरवून दिलेल्या कालखंडात अंमलबजावणी करावी, असेही खंडपीठाने म्हटले आहे. एका जनहित याचिकेवरील सुनावणीत न्यायालयाने हे आदेश दिले.

गतवर्षी १८ ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयाने राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशातील सरकारी शाळांमध्ये विशेषतः मुलींसाठी स्वच्छतागृहे बांधण्याचे निर्देश दिले होते. शाळांमध्ये स्वच्छतागृहे नसल्याने पालक मुलींना शाळेत पाठवत नसल्याचे निष्कर्ष काही संशोधकांनी न्यायालयासमोर मांडले होते. त्यानंतर न्यायालयाने हे निर्देश दिले होते.

पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृहे यासारख्या मूलभूत सुविधा शाळांमध्ये नसणे हे संविधानातील २१-अ कलमाअंतर्गत देशातील सर्व मुलांना बहाल करण्यात आलेल्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाच्या हक्काचे उल्लंघन ठरेल, असे निरीक्षणही सर्वोच्च न्यायालयाने नोंदविले आहे.