www.24taa.s.com, झी मीडिया, मुंबई
मुंबई विद्यापीठाच्या कुलसचिव पदावर नुकतीच डॉ. एम ए खान यांची नियुक्ती करण्यात आली मात्र, ही नियुक्ती बेकायदेशीर असल्याचा आरोप काही संघटनांकडून करण्यात येतोय. सहयोगी प्राध्यापक थेट कुलसचिव झाल्यामागे गौडबंगाल असल्याचा संशय व्यक्त केला जातोय.
हे आहेत मुंबई विद्यापीठाचे नवनियुक्त कुलसचिव.. डॉ. एम. ए. खान..... मात्र, यांची नियुक्ती नेमकी कशी झाली, याबाबत सगळ्यांनाच प्रश्न पडलाय. विद्यापीठ कायद्यानुसार आणि शासनाच्या नियमानुसार कुलसचिवपदाची नियुक्ती करताना उप कुलसचिवांना प्राध्यान्य दिलं जावं. या पदासाठी तीन उप कुलसचिवांनी अर्जही केले होते. पण तरीही एका खाजगी संस्थेच्या सहयोगी प्राध्यापकाची या पदावर थेट नियुक्ती करण्यात आली. याविरोधात महाराष्ट्र युनिव्हर्सिटीज ऑफिसर्स असोसिएशनकडून उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांकडे तक्रार करण्यात आलीय.
विद्यापीठाच्या जाहिरातीमध्ये उमेदवाराचा अर्ज कार्यालयामार्फतच आला पाहिजे, असा नियम आहे. पण खान यांचा अर्ज कार्यालयामार्फत तर आला नाहीच. शिवाय त्यावर कार्यालयाचं ना हरकत प्रमाणपत्र तब्बल 17 दिवस उशिरानं आलं.
खान यांच्या नियुक्तीच्या या गौडबंगालाची आम्ही विद्यापीठाकडे चौकशी केली, त्यावेळी तपास करुन उत्तर दिलं जाईल, अशी प्रतिक्रिया देण्यात आली. खुद्द कुलगुरु राजन वेळुकर यांच्या अध्यक्षतेखालच्या समितीमार्फत कुलसचिवांची नियुक्ती केली जाते. त्यामुळे याबाबतचा तपास पारदर्शक होणार का, यावरही संशय व्यक्त केला जातोय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.