www.24taas.com, नांदेड
नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या इंडिनिअरींग शाखेच्या पेपरफुटीप्रकरणी हिंगोली जिल्हयातून एका प्राचार्याला आणि प्राध्यापकाला पोलिसांनी अटक केली आहे. मंहमद इकरोमिद्दीन असं या प्राचार्याचं नाव आहे त्यानं प्राध्यपकाच्या मदतीनं गणित विषयाचा पेपर फोडल्याची माहिती समोर आली आहे.
नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या इंजिनिअरिंग शाखेच्या गणित विषयाचा पेपर 29 मेला फुटला होता. त्यानंतर पेपर रद्द करण्यात येऊन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला. आता या पेपरफुटी प्रकरणाचा सुगावा पोलिसांना लागलाय. हिंगोली जिल्ह्यातील व्ही.के.पाटील इंजिनिअरिंग कॉलेजच्या प्राचार्यानं आपल्याच कॉलेजमधील प्राध्यापकाच्या मदतीनं पेपर फोडल्याची बाब उघडकीस आली आहे. नांदेड पोलिसांनी याप्रकरणी प्राचार्य मंहमद इकरोमोद्दीन सह प्राध्यापक सय्यद मुनशीरला अटक केली आहे.
या प्राचार्यानं दोन विद्यार्थ्यांना प्रत्येकी 20 हजार रूपयांना गणिताचा पेपर विकल्याची माहिती मिळालीय. पेपरफुटीचे प्रकार टाळण्यासाठी कडक उपाययोजना करण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे. प्राचार्यांच्या या दुष्कृत्यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. ज्ञानरूपी मंदिरातून विद्यादानाचं कार्य करणारे शिक्षकच असे प्रकार करू लागले तर विद्यार्थ्यांनी आदर्श तरी कुणाचा घ्यायचा असा प्रश्नही यानिमित्तानं उपस्थित होतो.