www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
विसराळूपणावर आधारित विनोदी चित्रपट खरं तर नवीन नाहीत. राजकुमार गुप्ता यांचा ‘घनचक्कर’ हा चित्रपटही याच पठडीतला आहे. धमाल विनोदी सिनेमा म्हणून हा सिनेमा पाहायला मजा येते.
मनोरंजन आणि धमाल
‘आमिर’ आणि ‘नो वन किल्ड जेसिका’च्या यशानंतर राजकुमार गुप्ता ‘घनचक्कर’ च्या रुपाने पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी हास्याची मेजवानी घेऊन आला आहे. इमरान हाश्मी आणि विद्या बालन यांनी पती पत्नीची महत्त्वाची पात्रे साकारली आहेत. या चित्रपटाचे कथानक विद्या बालन आणि इमरान हाश्मी यांच्याभोवती फिरतयं. संजय अत्रे(इमरान हाश्मी) आणि नीतू (विद्या बालन) हे दोघे पती-पत्नी. संजय मराठी तर नीतू पंजाबी आहे. त्यामुळे या दोघांचं लग्नही असामान्य आहे. त्यांच्यात वाद चालूच असतात. मात्र तितकंच दोघांचं प्रेम आणि विश्वासही आहे. संजय हा आळशी आणि आरामाचं आयुष्य जगणारा असा नवरा आहे तर नीतू ही फॅशनेबल आहे, त्याचबरोबर लगेच चिडणारीही आहे.
कथानक
एकदा संजय आणि त्याचे मित्र पंडित (राजेश शर्मा) आणि इद्रीस (नमित दास) बॅंकेतून ३५ करोडची चोरी करण्यात यशस्वी होतात आणि तीन महिन्यांनंतर आपण हे वाटून घेऊ असे ठरवतात. कारण तोपर्यंत हे प्रकरण थंड झालेले असेल. त्यादरम्यानच संजयचा अपघात होतो आणि त्याची स्मरणशक्ती निघून जाते. त्याला आधी घडलेले काही आठवतच नाही. पैशांची बॅग कोठे ठेवली आहे, हेही तो विसरतो. पण पंडित आणि इद्रीस यांना असं वाटत की संजय विसरण्याच नाटक करतोय. परंतु या सगळ्याशी नीतूला काही घेणदेण नसतं ती मस्त तिच्या आयुष्यात आणि फॅशनसध्ये रमलेली आहे. यानंतरच सुरुवात होते ती खऱ्या कथानकाला आणि मस्तीला.
अभिनय कलाकारांचा
इमरान हाश्मीचा अभिनय चांगला आहे आणि त्याचबरोबर तेवढ्याच ताकदीने साथ दिलीय ती विद्या बालनने. काही ठिकाणी सिनेमा थोडासा भरकटतोय की काय असं वाटत मात्र संपूर्ण चित्रपट पाहता ते विशेष लक्षात येत नाही. राजेश शर्मा आणि नमित दास यांनीही खूप छान अभिनय केलाय. विद्या बालनने नीतूची भूमिका धमाल साकारली आहे. राजकुमार गुप्ता यांनी चित्रपटाचा सस्पेंस शेवटपर्यंत ठेवलाय. जेणेकरून प्रेक्षक खिळून राहतील.
कथानक मध्येच थोडासा वेग घेते तर काही ठिकाणी संथपणे चालते परंतु पूर्ण चित्रपटात मात्र कथानकाची पकड घट्ट आहे. पाहुणे कलाकार म्हणून अमिताभ बच्चन, धर्मेन्द्र आणि चक्क उप्पल दत्तही सिनेमात पाहायला मिळतात.
का पाहावा चित्रपट
आठवड्यभराच्या कामाने थकला असाल, माइंड रिफ्रेश करायच असेल, तर हा चित्रपट नक्की पाहा. आणि भरपूर हसण्याचा आनंद घ्या.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.