Sanjay Raut Big Claim About Eknath Shinde Group: "महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडीत आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांचे लोक कोठेच दिसत नाहीत. मुख्यमंत्री म्हणून शिंदेंवर झोत होता तो संपला आहे व मुख्यमंत्री फडणवीस आपल्याला विचारीत नाहीत या दु:खात स्वत: शिंदे अखंड डुंबले आहेत," असं राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. "फडणवीस व शिंदे यांच्यात वरवरचे बोलणे आहे व मंत्रिमंडळांच्या बैठकांनाही उपमुख्यमंत्री शिंदे हजर राहत नाहीत हे सत्य आहे. दु:खाचा कडेलोट झाला की, उपमुख्यमंत्री शिंदे हेलिकाप्टरने साताऱ्यातील दरेगाव गाठतात व डोके थोडे शांत झाले की, ठाण्याला परत येतात, पण डोके शांत झाले तरी त्यांचे मन:स्वास्थ्य सुधारत नाही," असं राऊतांनी म्हटलं आहे.
"एकनाथ शिंदे यांचे मन:स्वास्थ्य आता इतके बिघडले आहे की, ते आता आमदारांवरच चिडचिड करतात असा खुलासा त्यांच्याच एका प्रिय आमदाराने केला," असं 'सामना'तील 'रोखठोक' या सदरातील आपल्या लेखात संजय राऊतांनी म्हटलं आहे. "शासकीय बैठकांना शिंदे दोन तास उशिरा पोहोचतात. दि. 30 रोजी जिल्हा नियोजन मंडळाची बैठक वर्ल्ड ट्रेड सेंटरला झाली. त्या बैठकीत शिंदे किमान अडीच तास उशिरा पोहोचले. त्यांचे कामात मन रमत नसल्याचे हे लक्षण. शिंदे हे बैठकांना उशिरा पोहोचतात व त्यामुळे सगळ्यांचाच खोळंबा होतो अशी तक्रार भाजपच्या आमदारांनी आता मुख्यमंत्र्यांकडे केली," असा दावा राऊतांनी केलाय.
"फडणवीस हे आज सरकारचे प्रमुख आहेत व शिंदे हे कालपर्यंत त्याच सरकारचे प्रमुख होते व आता दोघांचे पटत नाही. "मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यामध्ये फार मोठे मतभेद नाहीत", असे भाजपच्या ज्येष्ठ मंत्र्याने मला अलीकडेच सांगितले. (म्हणजे लहानसहान मतभेद आहेत. उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे यांच्यातही फार मोठे मतभेद नव्हते. असलेच तर ते लहानसहान मतभेद असतील, पण पुढे काय झाले ते देशाने पाहिले.)" असं राऊत म्हणालेत.
नक्की वाचा >> 'शिंदेंना संशय आहे की दिल्लीच्या एजन्सी त्यांच्या...'; फडणवीसांचं नाव घेत राऊतांचा खबळजनक दावा
"चित्र असे आहे की, शिंदे यांच्या बहुतेक आमदारांत आता चलबिचल आहे. त्यातील एक मोठा गट थेट भाजपात जाऊन देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व स्वीकारण्याच्या तयारीत आहे. दुसरा गट शिंदेंवर दबाव आणीत आहे. झाले गेले विसरून पुन्हा स्वगृही परतू, या चर्चा जोरात आहेत, पण केंद्रीय तपास यंत्रणांच्या भयामुळे नेते निर्णय घेत नाहीत व गुलियन बारी सिन्ड्रोमच्या आजाराप्रमाणे हातापायांना आणि मेंदूलाही मुंग्या आल्याचा भास या सगळ्यांना होतो आहे. हे चित्र गमतीचे आहे. शिंदे गटातले मोजके लोक मंत्री झाले व उरलेले पैसा व ठेकेदारीच्या उबेवर जगत आहेत. शिंदे या सगळ्यांचे नेतृत्व किती काळ करू शकतील?" असा सवाल राऊतांनी विचारला आहे.