Mahant Namdeo Shastri Exclusive Interview: महंत नामदेवशास्त्रींनी धनंजय मुंडेंना पाठिंबा दिला. या पाठिंब्यानं धनंजय मुंडेंना समाजाची सहानुभूती मिळेल असं वाटलं होतं. पण झालं उलटच धनंजय मुंडेंना सहानुभूती मिळणं दूरच राहिलं, उलट नामदेवशास्त्रीच टीकेचे धनी झालेत. सहानुभूतीच्या या अस्त्राचं नामदेवशास्त्रींवरच बुमरँग झाल्याचं पाहायला मिळालं.
भगवानगडाचे मंहंत नामदेवशास्त्रींनी अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडेंची पाठराखण केली. धनंजय मुंडेंना आपण पाठिंबा दिल्यास समाजही धनंजय मुंडेंना पाठिंबा देईल आणि धनंजय मुंडेंविषयी सहानुभूती निर्माण होईल असा शास्त्रीजींचा अंदाज होता. पण त्यांनी जे ठरवलं ते झालं नाही. त्यांनी पाठिंबा जाहीर केल्या क्षणापासून त्यांच्या भूमिकेवर टीका होऊ लागली. झी 24 तासला दिलेल्या मुलाखतीत नामदेवशास्त्रींनी धनंजय मुंडेंचं आपण वैयक्तिक भूमिकेतून पाठराखण केल्याचं सांगितलं.
एरव्ही राजकीय भूमिका न घेणारे नामदेवशास्त्री यावेळी मात्र धनंजय मुंडेंची पाठराखण करताना पुढं आल्याचं पाहायला मिळालं. भगवानगडाचे महंत राजकीय भूमिका कशी घेऊ शकतात असा प्रश्न विचारल्यावर ही भूमिका भगवानगडाची असल्याचं घूमजाव नामदेवशास्त्रींनी केलं.
महंतांनी धनंजय मुंडेंच्या डोळ्यात वेदना आणि थकवा दिसल्याचं सांगितलं होतं. धनंजय मुंडेंच्या हातावरची सलाईनची सुई आणि रक्त दिसल्याचं सांगितलं. झी 24 तासच्या मुलाखतीचा हवाला देत मनोज जरांगे पाटलांनी नामदेवशास्त्रींना संतोष देशमुखांच्या मुलांच्या वेदना दिसल्या नाही का असा प्रश्न विचारला..
धनंजय मुंडेंची पाठराखण करणा-या महंतांच्या भूमिकेचा खासदार बजरंग सोनवणेंनी समाचार घेतला. नामदेवशास्त्रींनी धनंजय मुंडेंच्या पाठिशी समाजाचं बळ आहे हे सांगण्यासाठी जाहीर पाठिंबा दिला. पण या पाठिंब्याचा त्यांच्यावरच बुमरँग झाला. धनंजय मुंडेंच्या पाठिशी सहानुभूतीचा लाट उभी राहण्याऐवजी नामदेवशास्त्रींविरोधातच संतापाची लाट निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं.