Zee Marathi New Serial : गेल्या अनेक दिवसांपासून एकापाठोपाठ नव-नवीन मालिका कलर्स मराठी आणि स्टार प्रवाहवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ज्यामध्ये झी मराठीवर देखील अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. अशातच आता एका नवीन मालिकेचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. लवकरच 'तुला जपणार आहे' ही नवीन मालिका प्रदर्शित होणार आहे. या मालिकेच्या प्रोमोमध्ये एका आईची तिच्या मुलीला वाचवण्यासाठीची धडपड बघायला मिळत आहे. त्यासोबतच प्रोमोमध्ये मालिकेची रिलीज डेट आणि वेळ देखील जाहीर करण्यात आली आहे.
ही मालिका घेणार निरोप?
दरम्यान, 'तुला जपणार आहे' या मालिकेचा नवा प्रोमो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. या मालिकेच्या प्रोमोमधील VFX चं प्रेक्षकांनी कौतुक केलं आहे. झी मराठीवरील ही मालिका 17 फेब्रुवारीपासून रात्री 10.30 वाजता सुरु होणार आहे. त्यामुळे या ठिकाणी दाखविण्यात येणारी पहिली मालिका निरोप घेणार की काय असा प्रश्न सध्या प्रेक्षकांना पडला आहे. झी मराठीवर सध्या 10.30 वाजता 'तुला शिकवीन चांगलाच धडा' ही मालिका दाखवण्यात येत आहे.
काही दिवसांपूर्वीच झी मराठीवर 'लक्ष्मी निवास' ही मालिका सुरु झाली आहे. अशातच आता आणखी एक 'तुला जपणार आहे' ही हॉरर मालिका सुरु होणार आहे. हॉरर मालिकांसाठी पहिल्यापासूनच टाईम स्लॉट राखून ठेवण्यात आला आहे. यामुळे ही मालिका याच वेळी प्रदर्शित होणार आहे. 17 फेब्रुवारीपासून रात्री 10.30 वाजता ही मालिका प्रेक्षकांना पाहता येणार आहे. या मालिकेचा प्रोमो पाहून चाहते देखील प्रचंड उत्सुक झाले आहेत.
मालिकेतील कलाकार
या मालिकेत प्रमुख भूमिका अभिनेत्री प्रतीक्षा शिवणकर साकारणार आहे. तर चिमुकलीचं रक्षण करणाऱ्या मुलीच्या भूमिकेत अभिनेत्री महिमा म्हात्रे दिसणार आहे. तर या मालिकेत प्रमुख नायकाची भूमिका ही अभिनेता नीरज गोस्वामी साकारणार आहे. तर खलनायिकेच्या भूमिकेत अभिनेत्री रुचा गायकवाड दिसणार आहे. याआधी तिने सोनी मराठीवरील 'छोट्या बयोची मोठी स्वप्नं' या मालिकेत काम केलं आहे. त्याचबरोबर या मालिकेत तनिष्का विशे, मिलिंद पाठक, निलेश रानडे, पौर्णिमा तळवलकर, शर्वरी लोहकरे, सिद्धीरुपा कर्माकर आणि बालकलाकार अधिकी कसबे हे कलाकार दिसणार आहेत.