तुम्ही खाताय कॅन्सरवाला तांदूळ? धक्कादायक संशोधन आलं समोर!

Shocking Research On Eating Rice: तुम्ही जो तांदूळ म्हणजेच भात खाताय, त्यात प्लास्टीक आहे आणि त्याने तुम्हाला कॅन्सरही होऊ शकतो. 

Pravin Dabholkar | Updated: Feb 1, 2025, 07:12 PM IST
तुम्ही खाताय कॅन्सरवाला तांदूळ? धक्कादायक संशोधन आलं समोर! title=
कॅन्सरवाला तांदूळ

Shocking Research On Eating Rice: ज्यांना भात खाल्ल्याशिवाय पोट भरल्यासारखं वाटतच नाही त्यांच्यासाठी धक्कादायक बातमी. तुम्ही जो तांदूळ म्हणजेच भात खाताय, त्यात प्लास्टीक आहे आणि त्याने तुम्हाला कॅन्सरही होऊ शकतो. हे सगळं ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. मात्र यावर एक रितसर संशोधन झालंय. नेमकं काय आहे हे संशोधन? सविस्तर जाणून घेऊया.

आपल्यापैकी अनेकांचं जेवण भात खाल्लाशिवाय पूर्णच होत नाही. मात्र याच भातात म्हणजेच तांदळात सूक्ष्मप्लास्टीकचे कण आढळलेत. प्रा. डॉ. अनिल गोरे,  प्रा. गोविंद कोळेकर, कुमारी पिनल भावसार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या संशोधनात ही धक्कादायक माहिती समोर आलीय. डॉ. अनिल गोरे यांनी आपल्या संशोधनात भारतभरातील विविध तांदळाच्या नमुन्यांचं सूक्ष्मप्लास्टिक प्रदूषणासाठी विश्लेषण केलं. 

कर्करोग, श्वसन विकार, पचनाशी संबंधित विकारांचा धोका 

या अभ्यासात 100 ग्रॅम तांदळात सरासरी 30.8 अधिक 8.61 कण सूक्ष्मप्लास्टिक आढळले. पारदर्शक फायबर स्वरूपाचे कण, 100 ते 200 मायक्रोमीटर आकाराचे होते. तांदळात प्रामुख्यानं पॉलीएथिलीन (PE), आणि पॉलीएथिलीन टेरेफ्थेलेट (PET) हे  सूक्ष्म प्लास्टिक कण आढळले. हे धक्कादायक संशोधन जर्नल ऑफ हाझार्डस मटेरिअल्स या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित झालंय. तांदळातले हे सूक्ष्मप्लास्टिक अत्यंत घातक दूषित घटक आहे, जे मानव आणि पर्यावरणासाठी गंभीर धोका निर्माण करतात, असे या संशोधनानंतर डॉ. अनिल गोरेंनी नमूद केलं. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाजारातल्या तांदळाच्या विविध ब्रँण्डमध्ये सूक्ष्मप्लास्टिक कण आढळले. यामुळं कर्करोग, श्वसन विकार, पचनाशी संबंधित विकारांचा धोका असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 

उपाय काय?

विशेषतः पुरुष आणि मुलांपेक्षा महिलांमध्ये सूक्ष्मप्लास्टिक सेवन जास्त असल्याचं दिसून आलंय. या प्लास्टिक कोटेड तांदळापासून वाचण्यासाठी सोपे उपाय पुरेसं असल्याचं संशोधक अनिल गोरे सांगतात. त्यासाठी शेतकरी, व्यापाऱ्यांनू तांदळाच्या लागवडीसाठी आणि साठवणुकीसाठी शाश्वत आणि पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करण्याचा सल्ला संशोधकांनी दिलाय. तसंच शिजवण्याआधी तांदूळ पाण्यानं किंवा मिठाच्या पाण्यानं जास्तवेळा धुवून घ्यावा असा सल्ला त्यांनी दिलाय. 

जीवनशैलीत बदल

माणसाच्या रोजच्या अन्नात केमिकल, प्लास्टिक, विषारी घटकांचा शिरकाव खूप वाढलाय. आधुनिक जीवनशैलीसोबत आयुष्य सुलभ करणारे घटकच आता आयुष्याचे वैरी ठरू लागलेत. पृथ्वीवर फक्त प्लास्टिक टिकतं असा एका चित्रपटातला प्रसिद्ध डायलॉग आहे. मात्र हे प्लास्टिक पोटात जाऊन माणसाला पृथ्वीवरुन संपवू लागलंय याचं भान आतातरी माणसानं ठेवायला हवं आणि तसे बदल जीवनशैलीत करायला हवेत.