मुंबईत ED ची धाड सुरू असताना कंपनीच्या चेअरमनचा मृत्यू, पोलीस म्हणाले- तक्रार आलेली नाही!

अंधेरी येथील मालमत्तेत ईडीची टीम तपास करण्यासाठी पोहोचली असताना 62 वर्षीय दिनेश नंदवाना यांचा मृत्यू झाला.

पुजा पवार | Updated: Feb 1, 2025, 06:23 PM IST
मुंबईत ED ची धाड सुरू असताना कंपनीच्या चेअरमनचा मृत्यू, पोलीस म्हणाले- तक्रार आलेली नाही! title=
(Photo Credit : Social Media)

Mumbai News : मुंबईतील वक्ररांगे या टेक कंपनीचे (Vakrangee Technology Firm) चेअरमन दिनेश नंदवाना (Dinesh Nandwana) यांच्यावर शुक्रवारी अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीची (ED) धाड पडली. अंधेरी येथील मालमत्तेत ईडीची टीम तपास करण्यासाठी पोहोचली असताना 62 वर्षीय दिनेश नंदवाना यांचा मृत्यू झाला. यांच्या मृत्यूनंतर ईडीच्या कारवाईवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान पोलिसांनी दिनेश नंदवाना यांच्या मृत्यूचं कारण पोस्टमार्टमनंतरच समोर येईल असं सांगितलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ईडीची कारवाई सुरु असताना चेअरमन दिनेश नंदवाना यांची तब्येत बिघडली ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. 

वरिष्ठ पोलिसांनी मीडियाला सांगितले की, मृत दिनेश नंदवाना यांच्या कुटुंबाने ईडीच्या कारवाई दरम्यान त्यांना वाईट वागणूक देण्यात आली असे कोणतीही विधान केलेले नाही. जालंदर वरून आलेले ईडीचे युनिट स्थानिक टीमच्या सोबत दिनेश नंदवाना यांच्या विविध ठिकाणी असलेल्या मालमत्तांवर छापे टाकत होते. त्याचवेळी दिनेश नंदवाना यांची तब्येत खालावली. ईडी एखाद्या ठिकाणी छापेमारी करायला गेल्यावर तेथे उपस्थित असलेल्या लोकांचे स्टेटमेंट नोंदवते आणि कारवाई होत असताना त्या दरम्यान जिथे छापेमारी झाली आहे तेथील लोकांच्या हालचाली आणि संपर्क प्रतिबंधित करते. 

हेही वाचा : बदलापूर थेट तिसऱ्या मुंबईशी जोडणार; नवीन महामार्ग उभारणार, मुंबईत येणेही सोप्पे होणार!

 

वक्ररांगे टेक कंपनीने बीएसईला एक निवेदन जारी करत म्हटले की, " आम्हाला सांगताना खूप दुःख होत आहे की आमचे चेअरमन दिनेश नंदवाना यांचे 62 व्या वर्षी निधन झाले. त्यांनी आज 31 जानेवारी 2025 रोजी अखेरचा श्वास घेतला आहे. दिनेश नंदवाना हे पहिल्या पिढीतील उद्योजक होते. ज्यांनी अत्यंत मजबूत मूलभूत तत्त्वांच्या आधारे कंपनीला सध्याच्या पातळीवर आणण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती". उद्योजक दिनेश नंदवाना यांचा ईडीची कारवाई सुरु असताना मृत्यू झाल्यामुळे उद्योजक विश्वात खळबळ उडाली आहे.