'आम्हालाही जरा खूश करायचं...', महिला चाहत्यांच्या ओठांवर किस केल्यानंतर उदित नारायण यांचं स्पष्टीकरण

बॉलिवूडचे दिग्गज गायक उदित नारायण (Udit Narayan) यांचा महिला चाहत्यांना ओठांवर किस करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.   

शिवराज यादव | Updated: Feb 1, 2025, 05:39 PM IST
'आम्हालाही जरा खूश करायचं...', महिला चाहत्यांच्या ओठांवर किस केल्यानंतर उदित नारायण यांचं स्पष्टीकरण  title=

Udit Narayan Kissing Viral Video: बॉलिवूडचे दिग्गज गायक उदित नारायण (Udit Narayan) सध्या नेटकऱ्यांच्या निशाण्यावर असून त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. एका कार्यक्रमात परफॉर्म करताना महिला चाहत्यांच्या ओठावर किस केल्याने ते टीकेचे धनी ठरले आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) तुफान व्हायरल (Viral) झाला आहे. व्हिडीओत उदित नारायण सेल्फी घेण्यासाठी आलेल्या महिला चाहत्यांच्या ओठांवर किस करताना दिसत आहे. त्यांचं हे कृत्य पाहून चाहते नाराज झाले आहेत. आपल्या कृत्यावरुन वाद निर्माण झाल्यानंतर उदित नारायण यांनी आता यावर स्पष्टीकरण दिलं आहे. 

हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत उदित नारायण म्हणाले आहेत की, "चाहते आमच्यासाठी इतके वेडे असतात ना. आम्ही असे नाही आहोत. आम्ही फार सभ्य आहोत. काही लोक यासाठी प्रोत्साहन देतात आणि या माध्यमातून आपलं प्रेम दर्शवतात. आता ही गोष्ट पसरवून काय मिळणार आहे? गर्दीत इतके लोक आहेत, आमचे अंगरक्षकही तिथे उभे दिसत आहेत. पण चाहत्यांना आपल्याकडे भेटण्याची संधी आहे वाटतं आणि ते हस्तांदोलन करण्यासाठी हात पुढे करतात. यातील  काहीजण हातावर किस करतात. हा सर्व वेडेपणा असतो, त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही".

उदित नारायण यांनी हा व्हिडीओ नेमका कधीच आहे किंवा कार्यक्रम कुठे झाला होता याबद्दल अधिक माहिती दिली नाही. मात्र जेव्हा आपण स्टेजवर गात असतो तेव्हा चाहते वेडे होतात आणि आपल्याला त्यांना आनंदी ठेवायला आवडतं असं सांगितलं आहे. "माझी कौटुंबिक प्रतिमा अशी आहे की, प्रत्येकाला वाद व्हावा अशं वाटतं. आदित्यही फार शांत असतो, वादात अडकत नाही. मी जेव्हा स्टेजवर गात असतो तेव्हा एक वेडेपणा असतो. चाहते माझ्यावर प्रेम करतात आणि मी त्यांना आनंद होण्याची संधी देतो. अन्यथा आम्ही अशा प्रकारचे लोक नाही. आम्हालाही त्यांना खूश ठेवायचं असतं," असं ते म्हणाले आहेत.

महिला चाहतीच्या ओठांवर किस करण्यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, "मी गेल्या 46 वर्षांपासून इंडस्ट्रीत आहे. पण माझी अशी प्रतिमा नाही (जबरदस्ती किस करण्याची). याउलट जेव्हा चाहते मी स्टेजवर असताना प्रेमाचा वर्षाव करतात तेव्हा मी हात जोडतो, खाली झुकतो आणि विचार करतो आज ही जी वेळ आहे ती पुन्हा येवो न येवो".

व्हायरल व्हिडीओत काय?

व्हायरल झालेल्या व्हिडीओत एक महिला चाहती उदित नारायण यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी आलेली दिसत आहेत. सेल्फी काढल्यानंतर महिला त्यांच्या गालावर किस करते. यानंतर उदित नारायण थेट तिच्या ओठांवर किस करतात. उदित नारायण यांनी अचानक ओठांवर किस केल्याने महिलाही आश्चर्याने पाहत राहते. यावेळी गर्दी मात्र उत्साहात ओरडताना दिसत आहे. 

याच कार्यक्रमातील आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये एक तरुणी सेल्फी काढल्यानंतर त्यांना मिठी मारण्यासाठी जाते. यावेळीही उदित नारायण तिच्या ओठांवर किस करतात. 

हा व्हिडीओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. काहींनी तर उदित नारायण यंनी याआधीही अशा प्रकारे कृत्य केल्याच्या घटना खोदून काढल्या आहेत. यामध्ये त्यांनी गायिका अलका यागनिक आणि श्रेया घोषाल यांच्या गालावर परवानगी न घेता किस केल्याचं दिसत आहे. उदित नारायण यांनी या वादावर अद्याप भाष्य केलेलं नाही.