Nashik Accident: कोकणातील रत्नागिरी येथून महाकुंभमेळ्याला गेलेल्या भाविकांच्या गाडीला भीषण अपघात झाला आहे. नाशिकजवळ सिन्नर येथे झालेल्या भीषण अपघातात रत्नागिरी येथील तिघांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. या भीषण अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये रत्नागिरी डीएड कॉलेजचे माजी प्राचार्य प्रताप सावंत देसाई यांचा समावेश आहे तर चालक भगवान उर्फ बाबू झगडे व रत्नागिरी येथील हॉटेल व्यवसायिक अक्षय निकम यांचाही समावेश आहे. एकूण सातजण या गाडीमधून महाकुंभमेळ्यासाठी रत्नागिरी येथून निघाले होते. मात्र वाटेतच त्यांचा अपघात झाला. सर्व मयत व्यक्ती रत्नागिरीमधील खेडशी येथील रहिवासी होते. महाकुंभमेळ्यासाठी गेलेले यातील काहीजण एकमेकांचे नातेवाईक आहेत, अशी माहिती समोर आली आहे.
अपघातग्रस्त इनोव्हा कारमध्ये कोणकोण होतं याची माहिती समोर आली आहे. रत्नागिरी माळ नाका येथील येथील डीएड कॉलेजचे माजी प्राचार्य प्रताप सावंत देसाई, निवृत्त शिक्षक रमाकांत पांचाळ, रत्नागिरी येथील मंदिराचे विश्वस्त संतोष रेडीज, सुप्रसिध्द ऑडीटर किरण निकम, त्यांचे चिरंजीव अक्षय निकम व नातेवाईक प्रांजल साळवी तसेच वाहनचालक भगवान तथा बाबू झगडे असे 7 जण प्रवास करीत होते. यापैकी तीन जणांचा मृत्यू झाला आहे. किरण निकम यांची प्रकृती गंभीर आहे तर संतोष रेडीज, रमाकांत पांचाळ व प्रांजल साळवी यांना काही प्रमाणात जखमा झाल्या परंतु त्यांची प्रकृती स्थिर आहे.
हा अपघात नाशिक जिल्ह्यातील सिन्नरजवळ पहाटे 4 वाजता झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की या इनोव्हा गाडीचा चक्काचुर झाली. या भीषण अपघाताचे नेमके कारण अद्याप करू शकले नाही मात्र सर्व भाविक कुंभमेळ्यातील शाही स्नान सोहळ्यानंतर इनोव्हा गाडीने रत्नागिरीला परत येत होते. समोरुन येणार्या डंपरने जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे गाडीचा पुढचा भाग पूर्णपणे चेपला गेला आहे. या अपघातात गंभीर जखमी झालेले अक्षय निकम यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आल्यानंतर काही वेळाने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
महामार्गावरुन प्रवास करणार्या वाहनचालकांनी थांबून अपघातग्रस्तांना मदत केली. दरम्यान हा सगळा गंभीर अपघात झाल्याचे कळताच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. निवृत्त प्राचार्य प्रताप सावंत देसाई हे समाजकारणात सक्रिय होते. मराठा महासंघाचे ते सक्रिय पदाधिकारी कार्यकर्ते होते. अलीकडेच हॉटेल विवेक येथे झालेल्या मराठा महासंघाने कार्यक्रमातही त्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला होता. इतिहास हा त्यांच्या आवडीचा विषय होता. सावंत देसाई यांचे पश्चात पत्नी, एक मुलगा, मुलगी, सून, जावई असा मोठा परिवार आहे. महाविद्यालयातील निवृत्तीनंतर ते सामाजिक कार्यात रत्नागिरी येथे अग्रेसर होते. तर अक्षय निकम यांचा रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयाजवळ जवळ हॉटेल आहे. तेही सामाजिक कार्यात सक्रिय होते. तर चालक बाबू झगडे यांच्या पश्चात पत्नी, मुलं असा परिवार आहे.