www.24taas.com, झी मीडिया, अकोला
अकोल्यातील शासकीय मुकबधीर विद्यालयात मूकबधिर विद्यार्थ्यांकडून पायाची मालीश करून घेण्याचा घृणास्पद प्रकार या शाळेतील एका शिक्षिकेने केलाय. शीतल अवचार असं या शिक्षिकेचं नाव आहेय. गेल्या दोन वर्षांपासून अवचारबाईंचा हा कारभार सुरु होताय. अवचारबाईंचा हा कारनामा उघड केलाय याच मुकबधीर शाळेतील सातवीतल्या एका मुकबधीर विद्यार्थ्याने…
मुकबधिर मुलं चेपतायत शिक्षिकेचे पाय
विद्यार्थ्यांकडून करून घेतलं जातंय अशैक्षणिक काम
विद्यार्थ्यांकडून करून घेतलं जातंय पायांना मालिश
विद्यार्थ्यानेच उघड केला हा प्रकार
अकोल्यातल्या आदर्श नगर भागातली ही आहे शासकीय मुकबधिर मुलांची निवासी शाळा. पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग या शाळेत भरतात. या शाळेत २००९ पासून कार्यरत असलेली शिक्षिका मुलांकडून चक्क पाय चेपून घेते, पायांना मसाज करून घेते.. या शिक्षिकेचं नाव आहे शीतल अवचार... याच शाळेत सातवीत शिकणा-या एका विद्यार्थ्याने केलेल्या स्टींग ऑपरेशनमध्ये हा प्रकार उघड झालाय.
इथले विद्यार्थी भीतीपोटी हा प्रकार सहन करत होते. मात्र या मुलाने काही दिवसांपूर्वी हा प्रकार आपल्या पालकांना सांगितला. पालकांनी आधी या मुलाच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केलं. मग या मुलाने घरून मोबाईल नेऊन अवचारबाईंचे हे प्रताप चित्रित केले. मुलाच्या या स्टींग ऑपरेशननंतर मुलाच्या आईने याची तक्रार शाळेच्या प्रशासनाकडे केलीय.
अवचारबाईंनी याआधीही पाय चेपून घेणे, मुलांकडून मालिश करून घेणे, शाळेला दांड्या मारणे, जास्तवेळ मोबाईल बोलत बसणे असले प्रकार केलेत. त्याविषयी त्यांना समजही देण्यात आली होती. आता हा प्रकार उघड झाल्यावर या शिक्षिकेला तडकाफडकी निलंबीत करण्यात आलंय.
या संतापजनक प्रकरणात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. शीतल अवचार यांच्या या अविचारी कारनाम्यांबाबत शाळा प्रशासन अनभिज्ञ होतं का... शिक्षिकेच्या चुकांवर पांघरूण घातल्यानेच तिची हिंमत वाढली का... या प्रकरणी वऱिष्ठांनी डोळेझाक केली असेल तर त्यांच्यावर कारवाई होणार का.. या प्रश्नांची उत्तरं शाळा प्रशासनाला द्यावीच लागतील. तरचं भविष्य़ात अशा घटनांना आळा बसेल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.