www.24taas.com, सांगली
ऊस दरवाढ आंदोलनाच्यावेळी पोलिसांच्या गोळीबारात मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्याला तब्बल ५ गोळ्या लागल्याचं पोस्टमॉर्टम अहवालात स्पष्ट झालं आहे. उजव्या आणि डाव्या पायात प्रत्येकी दोन तर एक पोटात लागल्याचे डॉक्टरांनी मान्य केलं.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊसदरासाठी ३००० रूपये दर देण्यासाठी चक्का जाम आंदोलन सुरू आहे. आंदोलनाच्यावेळी सांगलीच्या चंद्रकांत नलवडे या शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता. या शेतकऱ्याला २ गोळ्या लागल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र आज त्याला तब्बल ५ गोळ्या लागल्याचं समोर आलं आहे. डॉ. गुरव यांनी याबाबत माहिती आधी दिली. मात्र, त्यांनी घुमजाव करत पाच ठिकाणी जखमा झाल्याचे म्हटले आहे. त्यामुळे संभ्रम अधिक गडद झाला आहे.
आज साताऱ्यात शेतकरी आणि आंदोलक अधिक संतप्त झालेत. त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली आणि तीन एसटी पेटविल्या. त्याधी खासदार राजू शेट्टीसह त्यांच्या सहकाऱ्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोवण्यात आली आहे. दरम्यान, सरकारने शेतकऱ्याची हत्या केली, असा आरोप शिवसेनेने केला आहे.