www.24taas.com,सातारा
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कालच्या आंदोलनाची धग आजही कायम आहे. आज शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी साता-यात आंदोलन केलं. पोलिसांवर दगडफेकही करण्यात आली तर साता-यातल्या शिवथरजवळ कार्यकर्त्यांनी तीन एसटी फोडल्या. दरम्यान, आंदोलकांच्या मृत्यूंच्या निषेधार्थ इंदापूर बंद पुकारण्यात आलाय.
इंदापूर बंदला संमिश्र प्रतिसाद मिळतोय. तर सांगली गोळीबार प्रकरणाची न्यायदंडाधिका-यांकडून चौकशी करण्याचं आश्वासन पतंगराव कदमांनी दिलयं. वनमंत्री पतंगराव कदमांच्या मध्यस्थीनंतर चंद्रकांत नलावडे यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास त्यांचे नातेवाईक तयार झालेत. गोळीबाराची दंडाधिका-यांमार्फत चौकशी करण्याचं आश्वासन कदमांनी दिलयं. सांगलीतल्या पोलिसांच्या गोळीबारात नलावडे यांचा मृत्यू झाला होता.
नलावडे यांच्या मृतदेह कालपासून सांगलीच्या जिल्हा रुग्णालयातच होता. जोपर्यंत दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली होती. यावर पतंगराव कदम यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन नलावडेंच्या नातेवाईकांशी चर्चा केली.
दरम्यान, ऊस दरासाठी सुरु असलेल्या आंदोलनाला अरविंद केजरीवाल यांनी पाठिंबा दिलाय. उद्या ते येरवडा जेलमध्ये खासदार राजू शेट्टींची भेट घेणार आहेत. केजरीवाल यांनी राजू शेट्टींना पाठिंबा देण्यासाठी ट्विट केलयं.