पाणी व्यवस्थापनातून वाचवलं केळीचं पीक

दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे शेतक-यांचं मोठं नुकसान झालंय. मात्र अशाही परिस्थितीत काही शेतकरी पाण्याचं व्यवस्थापन चोख करतात आणि चांगलं उत्पादन घेतात. अशा शेतक-यांपैकीच जळगाव जिल्ह्यातील ज्ञानेश्वर पाटील यांनी 25 एकरावरील कपाशी आणि केळीचं पीक वाचवण्याच यश मिळवलंय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Sep 4, 2012, 11:38 AM IST

www.24taas.com, जळगाव
सध्या मुंबईत पावसाने जोर धरला असला, तरी महाराष्ट्रातील अजूनही इतर प्रांतांत दुष्काळी परिस्थिती आहे. दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे शेतक-यांचं मोठं नुकसान झालंय. मात्र अशाही परिस्थितीत काही शेतकरी पाण्याचं व्यवस्थापन चोख करतात आणि चांगलं उत्पादन घेतात. अशा शेतक-यांपैकीच जळगाव जिल्ह्यातील ज्ञानेश्वर पाटील यांनी 25 एकरावरील कपाशी आणि केळीचं पीक वाचवण्याच यश मिळवलंय.
जळगाव जिल्ह्यातील जामनेरमध्येही दुष्काळाचं सावट असलं तरी ज्ञानेश्वर पाटील यांना मात्र त्याची चिंता नाही. पाण्याच्या योग्य नियोजनामुळे त्यांनी आपली कपाशी आणि केळीचं व्यवस्थापन चोख केल्यानं त्यांच्या पिकांना पाण्याचं ताण पडला नाही.
जामनेर तालुक्यात गेल्या एक ते दिड महिन्यांपासून जोरदार पाऊस झालाच नाही. इथल्या पिकांनी जेमतेम तग धरली असून पिकांची परिस्थिती पाण्याअभावी समाधानकारक नाही. मात्र ज्ञानेश्वर पाटील यांनी ठिबकचा वापर करुन चार दिवसाआड कापसाला वीस ते पंचवीस मिनिटे प्रतीव्हॉल एवढं पाणी दिलं.

25 एकरावरील पाण्याचं सुरुवातीपासूनच नियोजन केल्यानं त्यांची पीक सुरक्षित आहे.सध्याची पाण्याची अवस्था अशीच राहील तर कपाशीचं कमीत कमी 10 क्विंटल एवढं उत्पन्न अपेक्षित आहे.
केवळ ‘दुष्काळ दुष्काळ’ म्हणून ओरडत बसण्यापेक्षा जलस्त्रोतांमध्ये शिल्लक असलेल्या पाण्याचं काटेकोरपणे व्यवस्थापन केलं तर चांगलं उत्पन्न घेता येतं, याचं उत्तम उदाहरण ज्ञानेश्वर पाटील यांनी शेतक-यांसमोर ठेवलंय. जमिनीचं विभाजन आणि लागवडीचं क्षेत्र वाढल्यानं पाण्याची पातळी खाली गेलीय. त्यामुळे पाणलोटमधला भ्रष्टाचार आटोक्यात आणून पक्की कामं केली तर शेतकऱ्याला पक्कं पाणी लागेल हे निश्चित.