www.24taas.com, पुणे
बारामतीच्या डायनॅमिक्स डेअरीला पाणी द्यायला पुण्याच्या जिल्हाधिका-यांनी मनाई केलीय. याबाबतीतचं वृत्त झी 24 तासने दाखवलं होतं. त्याची दखल घेत डायनॅमिक्सला उजनीतून पाणी उचलता येणार नाही असे आदेश दिले आहेत.
महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असतानाही बारामतीच्या डायनॅमिक्स डेअरीला पाणीपुरवठा करण्यासाठी बारामती नगरपालिकेनं ठराव केला होता. या ठरावानुसार डायनॅमिक्सला पाईपलाईनने उजनीतील पाणी वापरायला मिळणार होतं. एकीकडे जनता दुष्काळाने होरपळत असताना या डेअरीला पाणी कसं काय मिळू शकतं, यासंदर्भातलं वृत्त झी 24 तासनं दाखवलं होतं. झी 24 तासच्या पाठपुरवठ्याची जिल्हा प्रशासनानं दखल घेतली आहे. जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी डायनॅमिक्सला उजनीतून पाणी उचलता येणार नाही असे आदेश काढले आहेत.
बारामती नगरपालिका पाणी देण्याचा ठराव करुच शकत नाही असं सांगून त्यांनी बारामती नगरपालिकेच्या ठरावाची प्रत मागवली आहे. ठरावाचा अभ्यास केल्यानंतरच निर्णय घेणार असल्याचं जिल्हाधिका-यांनी स्पष्ट केलंय. दुष्काळामुळे पिण्याच्या पाण्याला प्राथमिकता असून त्यानंतर शेती आणि त्यानंतर उद्योगांना अशा पाणी देण्यात येणार असल्याचं जिल्हाधिका-यांनी स्पष्ट केलंय.
झी 24 तासच्या वृत्तामुळेच हे पाणी आता बारामतीच्या सामान्य जनतेला मिळणार आहे. पवारांचे निकटवर्तीय असलेल्या गोयंकाच्या डेअरीला पाणी नाकारण्याचा निर्णय घेण्यात आल्याने पुण्याच्या राजकारणात चर्चा रंगू लागलीय...