www.24taas.com, सिंधुदुर्ग
कोकणात घराघरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पण, मालवणमधील एक गाव याला अपवाद आहे. या गावात कुणीही गणपतीची मूर्ती घरी आणत नाही. कुठलं आहे हे गाव ? का आणली जात नाही गावात गणपतीची मूर्ती ? पाहूयात विशेष वृत्तांत...
गणेशोत्सव म्हटलं की अगदी लहान थोरांपासून सर्वांसाठीच आनंदाची, उत्साहाची पर्वणी. कोकणात तसं सार्वजनिक गणपतीचं तेवढसं महत्त्व नाही. त्यामुळे घरोघरी हा सण साजरा केला जातो. मालवणमधील एक गाव मात्र याला अपवाद आहे. कोईल हे ते गाव... या गावात घरी गणपती आणला जात नाही.
गावात नदीच्या काठावर गणपतीचं एक सुंदर मंदिर आहे. या मंदिरातल्या मूर्तीवर गावकऱ्यांची नितांत श्रद्धा आहे. या गणेशाचं महत्त्व अबाधित राहावं, त्याच्यावरची श्रद्धा कमी होऊ नये, यासाठी घरोघरी गणेशपूजनच काय, घरात गणपतीचं कॅलेंडरसुद्धा कुणी लावत नाही. एवढच नाही, तर लग्नपत्रिकेवरही गणपतीचा फोटो लावला जात नाही. कोईल सिंधुदुर्गातच नव्हे तर संपूर्ण कोकणात आपलं वेगळेपण टिकवून आहे.