ऑडिट मतदारसंघाचं : नाशिक

ऑडिट मतदारसंघाचं : नाशिक

Updated: Apr 4, 2014, 05:10 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नाशिक
नाशिकमधून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण या मतदारसंघातून बिनविरोध लोकसभेवर निवडून गेले होते.
दक्षिण काशी म्हणून ओळखलं जाणारं नाशिक म्हणजे मंदिरांची नगरी. राज्यातील धार्मिक पर्यटनाचं केंद्र. शिर्डी, त्र्यंबकेश्वर आणि सप्तश्रृंगी देवीचा गड म्हटलं की आवर्जून आठवतं ते नाशिक. देश-परदेशातलं अनेक भाविक शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी जाण्याआधी नाशिकच्या रामकुंडात पवित्र स्नान करतात.
नारायण नागबळी करण्यासाठी देशातील एकमेव तीर्थनगरी म्हणून त्र्यंबकेश्वर, अशी भाविकांची श्रद्धा आहे. दर बारा वर्षांनी याच नगरीत सिंहस्थ कुंभमेळाही भरतो. रामायण-महाभारतातील अंजनेरी रामाचे जन्मस्थान, सीतागुंफा, तपोवन, पांडवलेणी अशी अनेक पुराणकालीन पर्यटनस्थळे या नगरीच्या महत्वाची साक्ष देतात.
 
स्वातंत्र्यपूर्व काळातील स्वातंत्र्यवीर सावरकरांचं हे जन्मस्थळ. आजही भगूर इथे त्यांचे स्मारक आहे. नाशिकची द्राक्षं जशी फेमस आहे, तसंच इथला कांदा देखील. पूरक उद्योग म्हणून वाईन उत्पादन सुरु झालेल्या या नगरीत आज चाळीस वाईनरी आहेत. त्यामुळं देशाची वाईन कॅपिटल म्हणूनही नाशिकची ओळख आता सातासमुद्रापार पोहोचलीय.
 
देशाच्या हवाई सीमा सुरक्षित ठेवण्यात बहुमोल मदत करणा-या वेगवान मिग आणि आता सुखोई विमानांचं उत्पादन देखील नाशिकजवळील ओझरच्या हिंदुस्थान एरोनोटीक्स लिमिटेडमध्ये होतं. युद्धात लढण्यासाठीच्या लष्करी पायदळाचा तोफखाना आणि हवाई दलाचं मुख्य प्रशिक्षण केंद्र नाशिकच्या देवळाली कँम्प परिसरात आहे. 
इतकंच नव्हे तर देशाचे चलन म्हणजेच दहापासून पाचशे-हजाराच्या नोटा नाशिकमध्येच छापल्या जातात. त्यासोबतच शासकीय बाँड, महसुली तिकिटे आणि पासपोर्टही नाशिकमध्येच तयार होतात. इतकंच नव्हे तर ऑटोमोबाईल उद्योगात आज महिंद्राच्या स्कार्पिओ, बोलेरो आणि व्हेरीटो या कारचं उत्पादन देखील इथंच होतं.
नाशिक लोकसभा मतदारसंघात 14लाख 48 हजार 414 मतदार आहेत.. यापैकी पुरुष मतदार  7 लाख 64 हजार 374  आहेत. तर महिला मतदार 6 लाख 84 हजार 40 आहेत.
नाशिकमध्ये 1963च्या पोटनिवडणुकीत महाराष्ट्राचे शिल्पकार माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी बिनविरोध विजय मिळविला. 1977 मध्ये विठ्ठलराव हांडे शेकापच्या तिकिटावर निवडून आले, 1980 मध्ये काँग्रेसचे प्रताप वाघ जिंकले  तर 1984मध्ये पुन्हा एकदा काँग्रेसचे मुरलीधर माने यांनी विजय मिळवला.
1989 ला भाजपाच्या दौलतराव आहेर यांनी तर 1991 ला काँग्रेसचे वसंत पवार यांनी बाजी मारील. 1996ला शिवसेनेचे राजाराम गोडसे तर 98 ला पुन्हा काँग्रेसच्या माधवराव पाटील यांनी नाशिक काबीज केलं. 1999ला आता मनसेचे आमदार असलेले उत्तमराव ढिकले शिवसेनेचे खासदार होते. 2004 पासून या मतदारसंघात राष्ट्रवादीचा पगडा दिसतोय. 2004 मध्ये देविदास पिंगळे तर 2009 मध्ये समीर भुजबळ यांच्या रुपाने राष्ट्रवादीने आपली छाप पाडलीय.
या मतदारसंघात कुठलाही खासदार आजपर्यंत सलग दुस-यांदा निवडून आलेला नाही. महत्वाचं म्हणजे काँग्रेस, शेकाप, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी अशा विविध राजकीय पक्षांचे खासदार मतदारसंघातून निवडून आलेत. आगामी निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी आणि  मनसे अशा तिरंगी लढतीत राष्ट्रवादी हॅटट्रिक साधणार का, याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे...
 
काका-पुतण्याच्या राजकारणाचा वसा
 
काका-पुतण्याच्या राजकारणाचा वसा नाशिकलाही लाभलाय. काकांच्या करिष्म्यानं ज्यांना तारलं, ते नाशिकचे मितभाषी खासदार समीर भुजबळ यांची ओळख.
खासदार – समीर मगन भुजबळ
जन्म -    9 ऑक्टो 1973
वय –      40
शिक्षण –   दहावी
राष्ट्रवादी काँग्रेसचा तरुण चेहरा असलेले समीर भुजबळ राजकीय पदार्पणातच खासदार म्हणून लोकसभेवर निवडून आलेत. छगन भुजबळ यांचे पुतणे ही समीर भुजबळांची खरी ओळख... आपल्या काकांच्या आशीर्वादाने 2009 मध्ये त्यांनी राजकारणात पहिलं पाऊल टाकलं ते लोकसभेच्या आखाड्यात.
भुजबळांसारखा `गॉडअंकल` पाठीशी असल्यानं ते नाशिक मतदारसंघात उतरले आणि मनसेच्या हेमंत गोडसेंना धूळ चारत त्यांनी विजय मिळविला.
समीर भुजबळ यांना  2 लाख 38 हजार 706 मतं मिळाली. मनसेच्या हेमंत गोडसे यांना  2 लाख 16 हजार 674 मतं मिळाली. तर शिवसेनेच्या दत्ता गायकवाडांना 1 लाख 58 हजार 251 मतं मिळाली...समीर भुजबळ यांनी 22 हजार 32 मतांनी विजय मिळवला.
खासदार या नात्यानं पेट्रोलिंयम आणि नैसर्गिक गॅस तसचं रेल्वेच्या स्थायी सल्लागार समितीचे ते सदस्य झाले