मोदींनी पत्नी मानलं यातच समाधानी - जशोदाबेन

लवकरच पंतप्रधानपदाची शपथ घेणाऱ्या नरेंद्र मोदी यांची पत्नी सध्या आनंदात आहेत. नरेंद्र मोदी पंतप्रधान पदावर आरुढ होणार आहेत आणि त्यांनी पहिल्यांदाच आपल्याला पत्नीच्या रुपात स्वीकार केलंय, याचाच आपल्याला खूप आनंद झाल्याचं जशोदाबेन यांनी म्हटलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 24, 2014, 01:51 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, अहमदाबाद
लवकरच पंतप्रधानपदाची शपथ घेणाऱ्या नरेंद्र मोदी यांची पत्नी सध्या आनंदात आहेत. नरेंद्र मोदी पंतप्रधान पदावर आरुढ होणार आहेत आणि त्यांनी पहिल्यांदाच आपल्याला पत्नीच्या रुपात स्वीकार केलंय, याचाच आपल्याला खूप आनंद झाल्याचं जशोदाबेन यांनी म्हटलंय.
जसोदा बेन या एका गुजरात टीव्ही चॅनलवर बोलताना दिसल्या. ‘हा माझ्यासाठी खूप आनंदाचा विषय आहे. मी त्यांची पत्नी असल्याचा मला गर्व आहे. मी देवाला प्रार्थना करेन की ते याच गतीनं पुढे वाटचाल करत राहो’.... जसोदाबेन यांची ही मुलाखत शुक्रवारी प्रसारित करण्यात आली.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी उमेदवारी अर्जात आपला पत्नी म्हणून उल्लेख केला याबद्दल जशोदाबेन यांनी मोदींचे आभार मानलेत. ‘त्यांनी (मोदींनी) जेव्हा 2014 मध्ये वडोदरामधून उमेदवारी अर्ज भरला तेव्हा पहिल्यांदाच त्यांनी मला पत्नीच्या रुपात स्वीकार केलं... कित्येक वर्षानंतर त्यांनी मला पत्नीच्या रुपात स्वीकार केलंय... मला खूप चांगलं वाटलं. ते मला इतक्या वर्षानंतरदेखील विसरले नाहीत’ असं यावेळी त्यांनी म्हटलंय.
मोदी यांनी सार्वजनिक जीवनात पहिल्यांदाच विवाहित असल्याचं कबूल केल्यानंतर प्रचारादरम्यान वाद निर्माण झाला होता. ‘यापूर्वी त्यांनी उमेदवारी अर्जात माझं नाव लिहिलं नव्हतं... पण, त्यांनी विवाहित असल्याचं कधी नाकारलंदेखील नव्हतं... मी त्यांची पत्नी आहे आणि नेहमीच राहील’ असं जशोदाबेन यांनी म्हटलंय.
‘मुख्यमंत्री बनल्यानंतर त्यांनी जे काही केलं ते त्या प्रकरणात निष्कलंक आहेत. हे त्यांचं कर्मच आहे जे त्यांनी पुढे घेऊन जायला मदत करतंय. ते स्वत:च्या प्रतिभेमुळेच नेहमी पुढे वाटचाल करत राहिलेत. त्यांच्या कार्यानं आणि प्रतिभेनंच त्यांना मोठा नेता बनवलंय’ असंही जशोदाबेन यांनी म्हटलंय. दोघांच्या वेगवेगळं राहण्याबाबतीत विचारण्यात आलेल्या प्रश्नाच्या उत्तरादाखल त्यांनी म्हटलं ‘आम्ही कधीही एकमेकांना घटस्फोट दिलेला नाही. आम्ही त्या पद्धतीनं कधीच वेगळं झालेलो नाहीत. आम्ही एकत्रच आहोत. देशाच्या सेवेसाठी ते घर सोडून निघून गेले आणि त्यामुळेच आम्ही वेगळे झालो’
यानंतर जशोदाबेन यांना तुम्ही मोदींना कधी भेटणार असा प्रश्न विचारला गेला असता त्यांनी या प्रश्नाचं ‘जेव्हा वेळ येईल, मी जाईन’ असं संक्षिप्त स्वरुपात उत्तर दिलं. शपथ सोहळ्यासाठी तुम्ही जाणार का? या प्रश्नावर त्यांनी ‘मला आमंत्रण मिळालं तर मी नक्कीच जाईन... का नाही जाणार?’ असं उत्तर दिलंय.
जशोदाबेन एक सेवानिवृत्त शाळा शिक्षिका आहेत. दोघेही अल्पवयीन असताना या दोघांचा विवाह झाला होता. लग्नानंतर तीन वर्षांतच मोदींनी आपल्या घराला आणि कुटुंबीयांना सोडलं आणि त्यानंतर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडले गेले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.