www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
देशात सातव्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. या टप्प्यात 7 राज्य आणि दोन केंद्रशासीत प्रदेशातल्या 89 मतदारसंघांचा समावेश आहे. 13 कोटी 83 लाख मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
गुजरात (26 ), जम्मू-काश्मीर व दादरा व नगर हवेली आणि दीव दमणच्या प्रत्येकी एक, पंजाब (13), उत्तर प्रदेश (14), पश्चिम बंगाल (9) तर आंध्र प्रदेश (17) जागा येथे मतदान सुरु झाले आहे. प्रमुख उमेदवारांमध्ये फारूख अब्दुल्ला ,अरुण जेटली , राजनाथ सिंह, सोनिया गांधी, श्रीप्रकाश जयस्वाल , मुरली मनोहर जोशी, बप्पी लहरी, ज्येष्ठ पत्रकार चंदन मित्रा, शरद यादव, राजेश रंजन ऊर्फ पप्पू यादव यांचा समावेश आहे.
बडोद्यातून भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी, तर गांधीनगरमधून भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, लखनऊमधून राजनाथ सिंग, अमृतसरमधून अरुण जेटली आणि कानपूरमधून मुरली मनोहर जोशी यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. तर काँग्रेसमधून अध्यक्षा सोनिया गांधी यांचे रायबरेली मतदारसंघातून भवितव्य ठरणार आहे.
जेडीयूचे अध्यक्ष शरद यादव हे बिहारच्या माधेपुरा मतदारसंघातून मैदानात आहेत. नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूख अब्दुल्ला श्रीनगरमधून निवडणूक लढवत आहेत. या सर्व दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागल्यानं या टप्प्याकडे सा-या देशाचे लक्ष लागलंय. एनडीएचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या बडोदा मतदारसंघातूनही या टप्प्यात निवडणूक होत असल्यानं या टप्प्याला विशेष महत्त्व आहे.
उत्तर प्रदेशातील लखनऊमधून राजनाथ सिंह, रायबरेलीतून सोनिया गांधी तर कोळसा मंत्री श्रीप्रकाश जयस्वाल कानपूर लोकसभा मतदारसंघातून मैदानात उतरले आहेत. यापैकी राजनाथ सिंह व सोनिया गांधी यांच्या विजयाचा दावा स्वपक्षीयाकडून करण्यात येत असला; तरी कुणाला सर्वाधिक मताधिक्य यावर कार्यकर्तेच पैजा लावत आहेत.
पश्चिम बंगालमधील श्रीरामपूर लोकसभा मतदारसंघातून संगीतकार बप्पी लहरी यांना भाजपने उमेदवारी बहाल केली. तेलंगणानिर्मितीच्या निर्णयामुळे आंध्र प्रदेशमध्ये काँग्रेसची कसोटी आहे.
तिसऱ्या आघाडीसाठी मोर्चेबांधणी करण्यात डावे पक्ष नेहमीच आघाडीवर असतात. त्यामुळ पश्चिम बंगालमधील ९ जागांवर होणारे मतदान महत्त्वाचे मानले जात आहे. मोदींवरील टिकेमुळे मोठय़ा प्रमाणावर मुस्लीम मते तृणमूलकडे वळू शकतात. त्यामुळे आता नवमतदारच भाजपचे भवितव्य ठरवतील.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.