कोकणात राष्ट्रवादीचा असहकार, राणेंचे डोकेदुखी वाढली

सध्या कोकणात राणे विरुद्ध राष्ट्रवादी असं धुमशान सुरू आहे. राष्ट्रवादीच्या या असहकारामुळे काँग्रेसची अर्थात राणे यांची डोकेदुखी वाढली आहे. नक्की कोकणातला हा राडा काय आहे. आणि त्याचा या लोकसभा निवडणुकीवर काय परिणाम होईल, याचीच चर्चा जास्त आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 12, 2014, 05:05 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, रत्नागिरी
सध्या कोकणात राणे विरुद्ध राष्ट्रवादी असं धूमशान सुरू आहे. राष्ट्रवादीच्या या असहकारामुळे काँग्रेसची अर्थात राणे यांची डोकेदुखी वाढली आहे. नक्की कोकणातला हा राडा काय आहे. आणि त्याचा या लोकसभा निवडणुकीवर काय परिणाम होईल, याचीच चर्चा जास्त आहे.
एक काळ कोकण शिवसेनेचा बालेकिल्ला होता. मात्र नारायण राणेंनी शिवसेना सोडली आणि तळ कोकणात काँग्रेस वाढली. त्याचबरोबर राष्ट्रवादीनंही कोकणात हातपाय पसरवायला सुरूवात केली. बघता बघात राष्ट्रवादी जोमाने वाढू लागली. त्याच राष्ट्रवादीला संपवण्याची भाषा राणेंनी केली आणि काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये वादाची ठिणगी पडली.
लोकसभा निवडणुकीआधीच राष्ट्रवादीनं भूमिका स्पष्ट केली. कोणत्याही परिस्थितीत निलेश राणेंचा प्रचार न करण्याचा निर्णय घेतला आणि आघाडीत बिघाडी झाली. राष्ट्रवादीच्या ४०० हून अधिक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेत.
राष्ट्रवादीच्या विरोधात नारायण राणे यांनी फोडाफोडीचं राजकारण केलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सव्वा सहा लाख मतदान आहे. त्यापैकी एक तृतीयांशी मतदानावर राष्ट्रवादी हक्क सांगतंय. फोडाफोडीच्या राजकारणानं नारायण राणेंनी गेल्या पाच वर्षात राष्ट्रवादीचे १७ सदस्य गळाला लावलेत. त्यामुळे राष्ट्रवादीला संपवण्याचा प्रयत्न राणे करतायत हे उघड आहे.
सध्या सिंधुदुर्गात काँग्रेसनंतर राष्ट्रवादीचा पक्षीय बलामध्ये दुसरा नंबर लागतो. सावंतवाडी, मालवण, वेगुर्ले आणि कणकवली नगरपरिषदेमध्ये राष्ट्रवादीचे ४८ नगरसेवक आहेत. जिल्हा परिषदेत १० तर पंचायत समितीमध्ये ४० सदस्य राष्ट्रवादीचे आहेत. त्यामुळे सिंधुदुर्गातला राष्ट्रवादीचा असहकार काँग्रेसची डोकेदुखी वाढवणार आहे.
सिंधुदुर्गात राष्ट्रवादीच्या दीपक केसरकर यांच्यापासून राणे विरुद्ध राष्ट्रवादी अशा वादाला सुरवात झाली. मडुरे रेल्वे टर्मिनलच्या मुद्यावरुन पहिली ठिणगी उडाली. सिंधुदुर्गाप्रमाणे नारायण राणे यांनी गेल्या दोन वर्षात राष्ट्रावीदीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांच्याशी रत्नागिरीतून वैर स्वीकारलं. दाखवण्यापुरते आज दोघांमधले वाद मिटले असले तरी राष्ट्रवादीचा असहकार नारायण राणेंना महागात पडू शकतो.
राणे विरुद्ध इतर सर्व अशी परिस्थिती नारायण राणे यांच्यासाठी नवीन नाही. मात्र राष्ट्रवादीच्या या भूमिकेमुळे यंदा राणेंची ताकद पणाला लागणार आहे.

पाहा व्हिडिओ

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.