मनपा, झेडपी मतमोजणी १७ फेब्रुवारीलाच!

जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकांची मतमोजणी एकाच दिवशी म्हणजे १७ फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती राज्याच्या निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायणन यांनी आज येथे दिली.

Updated: Feb 2, 2012, 05:42 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकांची मतमोजणी एकाच दिवशी म्हणजे १७ फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती राज्याच्या निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायणन यांनी आज येथे दिली.

 

विरोधी पक्षांच्या रेट्यामुळे निवडणूक आयोगाला हे पाऊल उचलावे लागेल. यासाठी केंद्रीय पातळीवरून इलेक्ट्रॉनिक मशीन मागविण्यात आले असून २७ तज्ज्ञांकडून मशीनची तपासणी करण्यात आली आहे. यापूर्वी जिल्हा परिषद निवडणूक ७ तारखेला आणि मतमोजणी ८ फेब्रुवारीला होणार होती. तर महापालिका निवडणुकीचे मतदान १६ फेब्रवारीला होणार असून मतमोजणी १७ तारखेला होणार आहे.

 

आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका ७ तारखेला झाल्यावर निकाल १७ फेब्रुवारी रोजीच लावण्यात येणार आहे.

जिल्हा परिषदेचे मतदान ७ फेब्रुवारीला झाल्यानंतर, या निवडणुकीची मतमोजणी लगेच ८ फेब्रुवारीला झाली, तर तिथल्या निकालांचा प्रभाव १६ तारखेला होणाऱ्या दहा महानगपालिकांच्या मतदानावर होऊ शकतो,  अशी भीती भाजपचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली होती.

मनसेनं हा मुद्दा थेट निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांच्यानिदर्शनास आणून दिला होता. मनसेचे आमदार बाळा नांदगावकर आणि सरचिटणीस शिरीष सावंत यांनी त्यांना या संदर्भातील एक निवेदन दिले होते. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही निवडणूक आयोग राज्य सरकारच्या दबावाखाली काम करते आहे का , असा प्रश्न उपस्थित केला होता. त्याची गंभीर दखल निवडणूक आयोगाने घेतली.

 

[jwplayer mediaid="40312"]

 

[jwplayer mediaid="40506"]