www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
`राष्ट्रीय आम पार्टी` नावाचा पक्ष स्थापन करून लोकसभा निवडणुकीत उडी घेण्याचा आपला निर्णय साफ चुकला, हे आता आयटम गर्ल राखी सावंतलाही कळून चुकलंय... (हेही नसे थोडके!)
मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून निवडणुकीला उभी राहिलेल्या राखीला मतदारांनी सपशेल तोंडावर पाडलंय. दोन हजार मतं मिळवून राखी सहाव्या नंबरवर राहिली. साहजिकच आहे की मतदारांनी राखीला साफ नाकारलंय. यामुळेच राखी आता वैतागलीय... पण थोडी शहाणीही झालीय... म्हणूनच तर तीनं आपला राजकीय पक्ष बंद करण्याचा निर्णय घेतलाय.
भाजपकडून पश्चिम बंगालसाठी मिळाली होती ऑफर...
`माझा राजकीय पक्ष सुरू करण्याचा निर्णय चुकला... मोदी लाटेमुळेच माझा पराभव झाला` असं राखीनं म्हटलंय. राखीच्या म्हणण्याप्रमाणे, भाजपाकडून पश्चिम बंगालमधून निवडणूक लढविण्याची ऑफर धुडकावून लावत तिनं मोठी चूक केलीय.
भाजपकडून कोणत्याही मतदारसंघातून उभी राहिली असती तर निवडून आली असती, असं राखीला आता वाटतंय. राखी प्रामाणिकपणे सांगतेय की तीनं या निवडणुकीसाठी खूप मेहनत केली इतकंच नाही तर जवळजवळ 40-50 लाख रुपयेही खर्च केले.... पण, तरीही पदरात पडली ती निराशाच... त्यामुळेच राखीनं आपल्या राजकीय करिअरला पू्र्णविराम देण्याचा निर्णय घेतलाय.
मुंबई उत्तर पश्चिम मतदार संघातून शिवसेनेच्या गजानन किर्तीकर यांनी विजय मिळवलाय. सेनेशिवाय, इथं मनसे, आप आणि बहुजन समाज पार्टीच्या उमेदवारानंही इथं राखीपेक्षा जास्त मतं मिळवली. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या मतदार संघात तब्बल 10 हजार 997 मतदारांनी `नोटा` म्हणजेच `यापैंकी कुणीही नाही` या बटनाचा वापर केलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.