www.24taas.com, झी मीडिया,रत्नागिरी
उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या विरोधात बंडखोरीचं निशाण उभारणाऱ्या सिंधुदुर्गातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्यात पक्ष नेत्यांना फारसं यश मिळाल नाही. नाराज कार्यकर्त्यांची उद्या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर बैठक निश्चित करण्यात आली आहे. या बैठकीनंतरच नारायण राणे यांच्याकरिता प्रचार करायचा की नाही याबाबतचा निर्णय राष्ट्रावादीचे कार्यकर्ते जाहीर करणार आहेत.
सिंधुदुर्गात नारायण राणे यांनी कधी पैसा तर कधी दहशतीच्या जोरावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला संपवण्याचाच प्रयत्न केला त्यामुळे लोकसभा उमेदवार नीलेश राणे यांचा आम्ही प्रचार करणार नाही, अशी भूमिका घेत सिंधुदुर्गातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले. बंडाचे निशाण फडकवणाऱ्या या पदाधिकाऱ्यांची मनधरणी करण्यासाठी कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड सिंधुदुर्गात आले. प्रथम त्यांनी कणकवलीत नारायण राणे यांची भेट घेतली. आणि मग सावंतवाडीत नाराज आमदार दीपक केसरकर यांची भेट घेतली.
सिंधुदुर्गातील नाराज नेते आणि कार्यकर्ते उद्या कळंबोली येथे शरद पवार यांची भेट घेतील असं आव्हाड यांनी जाहीर केलंय. आव्हाडांसमोर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्ये आणि पदाधिका-यांनी राणे यांच्या कार्यपद्धतीचा पाढा वाचला. दीपक केसरकर जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, अशी भूमिका त्यांनी घेतली.
नारायण राणे विजयाचा विश्वास व्यक्त करीत असले तरी राष्ट्रवादीच्या मदतीशिवाय विजयाचं गणित बिघडू शकतं, हे राणेंना पक्क माहीत आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळवण्यासाठी ते प्रयत्न करतायेत. राणे यांनी लवचिक धोरण स्वीकारले असून राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी बोलू असे म्हटलं आहे. त्यामुळे पवारांच्या निर्णयानंतर काय निर्णय होतो, याकडे लक्ष लागले आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.