सरचिटणीस, आरपीआय आठवले गट
दसरा मेळावा हा शिवसेनेचा कार्यक्रम असल्याने रामदासजी आठवलेंना बोलावले नाही, अशी बोंब मारणाऱ्यांना याची माहिती नसावी, असेच वाटते. काही अपवादात्मक परिस्थिती शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला भाजपचे काही नेते आले असतील. पण, आरपीआय आठवले गटाला बोलावले नाही, तरीही आम्हांला राग आला नाही. भविष्यात युतीची सभा याच शिवाजीपार्कवर होणार आहे. त्यावेळी रामदासजीही उपस्थितीत असतील.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दादर स्टेशनच्या नामांतराला विरोध केल्याने काही आंबेडकरी जनतेची मनं दुखावली, असल्याचे रामदास आठवले यांनी म्हटले, असले तरी ही शिवसेनेची भूमिका आहे. याचे राजकारण करून आंबेडकरी जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचे काम काँग्रेसने करू नये.
दादरच्या नामांतरावरून काँग्रेस-राष्ट्रवादी हे दलित जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. तसेच रामदासजी आठवलेंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करीत आहेत. आंबेडकरी जनतेनेही दादर स्टेशनच्या नामांतराची कधी मागणी केलीच नाही. ही काँग्रेस-राष्ट्रवादीच करीत आहेत. काँग्रेसला दादरचे नामांतर करायचे तर ते मागणी कुणाकडे करीत आहेत. राज्यात आणि केंद्रात त्यांचे सरकार आहे. त्यांची इच्छा शक्ती असेल तर त्यांनी तत्काळ नाव बदलावे. मुख्यमंत्र्यांनी रेल्वे मंत्र्यांना पत्र पाठवावे आणि दादर स्टेशनचे नामांतर करावे, त्यांना अडवलं कुणी आहे. गेल्या फेब्रुवारी महिन्यात ही मागणी आली होती. त्यानंतर आता ऑक्टोबर उजाडले. तरीही नामांतराचे काही झालं नाही, किंवा इंदू मिलचं ही काही झालं नाही. हे काँग्रेसवाले फक्त भावनिक खेळ करीत असून धूळफेक करीत आहेत.
दादर सारख्या छोट्या स्टेशनला नाव चैत्यभूमी नाव देण्याची काहीच गरज नाही. त्यापेक्षा ज्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर राहिले, अशा मुंबई सेंट्रल या स्थानकाला बाबासाहेबांचे नाव द्यावे, किंवा चैत्यभूमी नाव द्यावे. मुंबई सेंट्रल याला ऐतिहासिक महत्त्व आहे. त्यामुळे त्याचे नाव बाबासाहेबांच्या नावाने किंवा चैत्यभूमी द्यावे, अशी भूमिका आरपीआय आठवले गटाने मांडली आहे.
इंदू मिलच्या जमिनीवरूनही काँग्रेस लोकांची दिशाभूल करीत आहेत. इंदू मिलची एकूण १२.५ एकर जमीन असून त्यातील केवळ ४ एकर जमीन ही बाबासाहेबांच्या जागतिक कीर्तीच्या स्मारकासाठी देण्यात येणार आहे. तर उरलेल्या ८.५ एकर जमिनीवर पंचतारांकित शॉपिंग मॉल बांधण्याचा घाट काँग्रेस सरकारने घातला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी शिवसेनेतर्फे १ एकर जागा ही मुंबई घडविणारे नानाशंकर शेठ यांच्या स्मारकासाठी द्यावे, अशी मागणी करण्यात आली होती. शिवसेनेचा बाबासाहेबांच्या स्मारकाला विरोध, बाबासाहेबांच्या स्मारकांतील जमीन शिवसेनेला हवी, असा अपप्रचार करण्यात आला. परंतु, शिवसेनेने उर्वरित ८.५ एकर जागेतील एक एकर जागा नानाशंकर शेठ यांच्या स्मारकासाठी मागितली होती. बाबासाहेबांच्या स्मारकासाठी सर्व १२.५ एकर जमीन सरकार देत असेल तर शिवसेनेला ही जागा नको, असेही स्पष्टीकरण शिवसेनेने दिले आहे. त्यामुळे, आमच्या वितुष्ठ निर्माण करण्याचा काँग्रेसचा डाव आम्ही कधीही सफल होऊ देणार नाही.
युती किंवा कोणत्याही आघाडीत पक्षांमध्ये अनेक बाबतीत मतभेद असतात. काँग्रेस-राष्ट्रवादीशी आठवले गटाची आघाडी होती, त्यावेळीही आमचे मतभेद होते. रिडालोसमध्येही असताना होते. त्यामुळे काही विषयांवर आताही शिवसेनेच्या मताशी आम्ही पूर्णपणे सहमत आहोत, असे नाही. काही असले तरी भविष्यात आम्ही जनतेसमोर सामाजिक अजेंडा घेऊन जाणार आहोत. आरपीआय आठवले गटाने शिवसेनेकडे ६० जागांची मागणी केली आहे. त्यातील ४५ जागा मिळाल्या तरी आम्ही समाधानी आहोत. यावेळी आम्हांला किती जागा मिळतात, या पेक्षा आम्ही युतीच्या किती जास्तीत जास्त जागा निवडून आणू शकतो यावर भर असणार आहे. याला यश आले, तर महापालिकेबरोबर विधानसभेवर निळा-भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही.
शब्दांकन – प्रशांत जाधव