अर्जुन डांगळे, (आरपीआय आठवले गट)
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी आंदोलन करावं लागतं ही एक शरमेची आणि खेदजनक गोष्ट आहे. यासाठी केवळ आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरली आहे, याची पण खंत वाटत आहे. बाबासाहेब केवळ दलित जनतेचे नाही ते सर्व भारताचे आहेत. त्यांच्यासाठी रिपाइं किंवा आंबेडकर चळवळीच्या लोकांनी आंदोलन करावे आणि इतरांनी गंमत पाहावी ही गोष्ट मनाला पटत नाही.
बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने राजकारण होतं आहे, हे चांगली गोष्ट नाही. रिपब्लिकन पक्षाला बाबासाहेबांच्या नावाने राजकारण करायचं नाही. काँग्रेस हे करायचं पण आहे आणि बाबासाहेबांचं स्मारक पण करायचं नाही. काँग्रेस प्रत्येक वेळेस राज्य घटनेचा आधार घेत, आपला बचाव करीत असते. त्याच राज्य घटनेचे शिल्पकार बाबासाहेबांचा अपमान का करीत आहे. प्रत्येकवेळी आंबेडकर जनतेलाच का रस्त्यावर यावे लागते आहे? आंबेडकरी जनतेने कायम संघर्षच करावा का? अशा प्रकार गंभीर प्रश्न समोर येत आहे. आंबेडकरी जनतेला आंदोलनात अडकवून सत्तेच्या राजकारणापासून दूर ठेवण्याचा काँग्रेसचा हा कुटील डाव असल्याचा माझा आरोप आहे. नामांतराच्या चळवळीत आंबेडकरी जनतेची एक पिढी वाया गेली आता या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी आणखी एका पिढी काँग्रेसला वाया घालवायचं का हा मुळात प्रश्न आहे.
काँग्रेस पक्षाचे आणि त्यांच्या अध्यक्षांचे मला अभिनंदन करावेसे वाटते, की त्यांनी ५५ वर्षांनंतर कळालं की बाबासाहेब हे महामानव आहेत. त्यांचं स्मारक व्हायला हवं. यासाठी ५५ वर्ष लागली पण त्यांना कळालं हे का थोडं आहे.
या जागेची किंमत १५०० कोटी आहे. असे सांगणाऱ्या सरकारला लाज कशी वाटत नाही की ते बाबासाहेबांची किंमत पैशात करतात. त्यांची मुळात इच्छा शक्ती नाही. की मुंबईत अशा प्रकारचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक व्हावे. केवळ आश्वासन दिले जातात पण आता आंबेडकरी जनता या भूल-थापांना बळी पडणार नाही. सरकारला त्या जागेची किंमत हवी आहे ना? त्यांनी ती किंमत सांगावी. आंबेडकरी जनता आता एका आठवड्यात वर्गणी काढून जागेची किंमत देईल. मुळात काँग्रेसचे हे सरकार आंबेडकरांची किंमत पैशात करतात. त्यांना लाज कशी वाटत नाही.
राज्यातील काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांची किंवा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्ली किती ऐकलं जातं हे या सर्व प्रकारावरून कळते. त्यांचं सरकार असताना त्यांना पंतप्रधान मनमोहन सिंग यांना आपलं म्हणणे पटवून देता येत नसेल तर त्यांची किती पत आहे, हे लक्षात येतं. मुळात अशा प्रकारचं स्मारक बनावं, ही दोन्ही काँग्रेसची इच्छा शक्तीच नाही, हे मात्र सत्य आहे.
इंदू मिल येथे बाबासाहेबांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक झाले, तर या ठिकाणी देश परदेशातून पर्यटक भेट देतील आणि या ठिकाणी लाइट शो, सचित्र गॅलेरी, ग्रंथालय असं उपलब्ध करून दिलं. तर बाबासाहेबांच्या विचारांचं सोनं येथे दरवर्षी येणाऱ्या ५० लाख जनतेला लुटता येणार आहे.