www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
खोकला झाल्यावर साधारणतः वापरण्यात येणाऱ्या कफ सिरप्समध्ये अमली पदार्थ असतात, हे तुम्हाला माहित आहे का? अमली पदर्थांचं व्यसन असणारे अनेक व्सनी लोक वेळेवर अमली पदार्थ न मिळाल्यास वा खिशात पुरेसे पैसे नसल्यास कफ सिरपचा वापर करून आपली नशा भागवतात. त्यामुळे अशा कफ सिरपमधील अमली पदार्थांवर बंदी घालण्याची मागणी अन्न आणि औषध प्रशासनाने राज्य सरकारला केली आहे.
अनेक मेडिकल स्टोअर्समध्ये सहज उपलब्ध होत असलेल्या कफ सिरप्समध्ये अमली पदार्थ असातात. कोडेन फॉस्फेट नामक नशिला पदार्थ बऱ्याच कफ सिरप्समध्ये वापरला जात असल्याचं अन्न आणि ऑषध प्रशासनाला मेडिकल स्टोअर्सच्या पाहाणीत आढळून आलं. अशा औषधांमुळेही तरुणांना नशेचं व्यसन लागू शकतं, हे दिसून आलेलं आहे. राज्यात पुरवठा होणाऱ्या कोडेन फॉस्फेट मिश्रीत कफ सिरपवर बंदी आणणं किंवा कोडेन फॉस्फेटचं कफ सिरपमधील प्रमाण कमी करणं हाच त्यावर उपाय असल्याचं म्हणत औषध आणि अन्न सुरक्षा प्रशासनाने राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवला आहे.
अनेकदा कफ सिरप्सची विक्री डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय होत असल्याने अनेक लोक सर्रास कफ सिरप्स विकत घेतात. कोडेन फॉस्फेटच्या विक्रीच्या अंदाजाचा विचार केल्यास राज्यात १.६ % लोक कफ सिरपद्वारे अमली पदार्थाचं सेवन करत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे कोडेन फॉस्फेटचं अधिक प्रमाण असलेल्या कफ सिरपविरोधात कारवाई करण्यास औषध आणि अन्न सुरक्षा प्रशासनाने सुरूवात केली आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.