मुंबई : तीस वर्षांची व्यक्ती दिवसाला पाच सिगारेट ओढत असेल तर ६० व्या वर्षापर्यंत सिगारेटचे व्यसन आणि त्याच्या जोडीने येणाऱ्या आजारांमुळे एका व्यक्तीला तब्बल १ कोटी रुपयांचा खर्च होऊ शकतो असा धक्कादायक निष्कर्ष 'ईटी वेल्थ'च्या अभ्यासातून समोर आलाय. म्हणजेच एका सिगरेटमुळे तुम्ही 12 मिनिटांचं आयुष्य गमावता.
३१ मे रोजी तंबाखू विरोधी दिवस पाळला जातो त्या निमित्ताने याबाबत अभ्यास केला असता ही माहिती समोर आलीये. सिगारेटच्या व्यसनाने जीवघेण्या आजारांना आमंत्रण मिळतेच पण तुमचा खिसाही चांगलाच कापला जातो असे वास्तव 'ईटी वेल्थ'ने समोर आणलेय. सिगारेटमुळे तुमच्या खिशाला कसा खर्चाचा फटका बसतो, हे जाणून घेऊया...
सिगारेट खरेदीवरील खर्च
साधारणपणे एका सिगारेटची किंमत १० ते १५ रुपये असते. जर एका सिगारेटची किंमत सरासरी १२ रुपये धरली तर त्यानुसार दररोज पाच सिगारेटसाठी ६० रुपये लागतील. म्हणजेच महिन्याला १८०० रुपये खर्च येईल. अशाप्रकारे ३० वर्षे सिगारेट ओढल्यास २४.४७ लाख रुपये खर्च होतील. हेच पैसे जर कुठे गुंतवले तर ९ टक्के व्याजाने त्याचे ६९ लाख २३ हजार रुपये तुम्हाला मिळतील.
उपचारांवर खर्च
सिगारेटच्या व्यसनाने आजारांनाही आमंत्रण मिळते. सिगारेटच्या व्यसनामुळे श्वासाचे, फुफ्फुसांचा कर्करोग, हृदयविकार, अस्थमा यांसारखे आजार झाल्याचे आपण ऐकलेच असेल. अशा व्यसनी लोकांना दरमहिन्याला साधारण ४०० रुपये औषधोपचारावर खर्च करावे लागतात. ज्याची ३० वर्षांत ११ लाख ५९ हजार इतकी रक्कम होते. हेच पैसे जर गुंतवले असते तर ३० वर्षांत व्याजासकट २६.७० लाख रुपये मिळू शकले असते.
विमाही पडतो महागात
सिगारेट ओढणाऱ्या व्यक्तींना विमा कंपन्या नेहमीच 'हाय रिस्क' प्रकारात धरतात. त्यामुळे या व्यक्तींकडून विम्याचा जास्त हप्ता घेतला जातो.
कुटुंबावरही परिणाम
सिगारेटचे व्यसन असणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबालाही या व्यसनाचे परिणाम भोगावे लागतात. विशेषत: लहान मुलांना सिगारटेच्या धुराचा फटका बसतो. त्यांची तब्येत बिघडल्यास तेदेखील फार खर्चिक ठरते.