www.24taas.com, लंडन
भाषा आणि मेंदू याचा काय संबंध? असा प्रश्न आपल्यालाही पडला असेल ना! पण, नवी भाषा शिकून डोक्याला चालना मिळू शकते, असा नवीन शोध नुकताच संशोधकांनी लावलाय. जर्मनीत झालेल्या एका संशोधनातून ही गोष्ट स्पष्ट झालीय.
संशोधकांच्या म्हणण्यानुसार, ज्या व्यक्ती नव-नव्या भाषा शिकण्याचा प्रयत्न करत असतात, त्यांना वाढत्या वयासोबत मेंदूची कार्यक्षमता कायम राखण्यात मदत होते. बर्लिन विश्वविद्यालयाच्या संशोधकांनी विविध भाषा शिकण्यात रुची असणाऱ्या ७५ लोकांचा आभ्यास केला. त्याशिवाय या संशोधकांनी आपल्या संशोधनात भाषांचा अभ्यास न करणाऱ्या लोकांचाही समावेश केला. संशोधनाअंती, नवीन भाषा शिकल्यानं आपल्या बुद्धीची सकारात्मकता वाढल्याचं या संशोधकांच्या लक्षात आलं.
भाषेचा अभ्यास करणाऱ्या आणि भाषेचा अभ्यास न करणाऱ्या व्यक्तींवर संशोधन केल्यानंतर, भाषेच्या अभ्यासानं आलेल्या सकारात्मकतेमुळे विचार करण्याची क्षमता वाढते, असा निष्कर्ष या संशोधकांनी काढलाय. त्यांच्या मते, भाषेचा अभ्यास करणाऱ्या व्यक्ती बुद्धीने आणि विचारांनी सक्षक्त राहतात. मग काय, नवीन भाषा शिकण्यासाठी तुम्ही कधी सुरू करत आहात?