www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
हृदयावरती एकाच वेळी सहा शस्त्रक्रिया करत मुंबईच्या एशियन हार्ट इन्स्टिट्युटमधील डॉक्टरांनी ओमान येथील ५६ वर्षीय नागरिक कासीन नासीर सुलतान अलरियानी यांना जीवनदान दिले. एशियन हार्ट इन्स्टिट्युटमधील (एएचआय)उपाध्यक्ष व व्यवस्थापकी संचालक डॉ.रमाकांत पांडा यांच्या नेतृत्वाखाली खाली सलग १२ तास सुरु असलेली ही शस्त्रक्रिया अत्यंत किचकट आणि कठीण ठरली.
या शस्त्रक्रियेत डॉक्टरांनी अलरियानी यांच्या छातीजवळचे हाड (ब्रेस्टबोन) मूळ जागी नीट बसवले, हृदयातील एक झडप दोषमुक्त केली तर दुसऱ्या दोषयुक्त झडपेचे प्रत्यारोपण करून त्यांचे अनियमितपणे पडत असलेले हृदयाचे ठोके पूर्ववत केले. हे सर्वच तज्ञ डॉक्टरांसमोरील मोठे आव्हान होते. दोन निरनिराळ्या देशांमध्ये हृदयावर शस्त्रक्रियेचे प्रयोग झाल्यानंतर एएचआयमधील हृदयरोग तज्ञांनी अलरियानी यांच्यावर ही शस्त्रक्रिया केली. प्रत्यक्ष हृदयापर्यंत पोहोचण्यासाठी पाच तासांचा कालावधी लागला आणि त्यानंतर असे समजून आले कि अलरियानी यांची संसर्ग झालेली हाडं, फुफ्फुसं, पेशी असे सगळेच घटक अव्यवस्थित स्थितीत असून हृदयास चिकटलेले आहेत. तसेच हृदय आणि अन्य अवयवांना एकमेकांपासून दूर ठेवण्यासाठी वंगणासारखे काम करणारी आतील त्वचा पूर्णपणे नष्ट झालेली आहे. त्यामुळे अलरियानी यांच्याबाबतीत हार्ट-लंग मशीन जोडणे या प्रक्रियेतील प्रत्येक पायरीवर डॉक्टरांना नवीन पद्धतींचा अवलंब करावा लागला असल्याचे डॉ. पांडा यांनी सांगितले. रुग्णाच्या मुळातच नाजुक परिस्थितीत असलेल्या हृदयावर एकाचवेळेस या शस्त्रक्रिया केल्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया कठीण ठरली.
ही शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांनी पारंपारिक पद्धतीने शस्त्रक्रिया करताना हार्ट-लंग मशीन हे रूग्णाच्या मांडीच्या सांध्यामार्फत (ग्रोईन) जोडले जाते. पण अलरियानी यांच्या रक्ताशयाच्या मुख्य वाहिनीमध्ये-महारोहिणीमध्ये-स्टेन्ट बसविण्यात आल्यामुळे या पद्धतीने मशीन जोडले असते तर रक्तप्रवाह हृदयाच्या दिशेने उलट जाण्याची शक्यता वाढली असती आणि परिणामी त्यांचा मृत्यू झाला असता. त्यामुळे आम्ही मानेजवळच्या हाडातून हृदयाच्या धमनीसाठी एक कृत्रिम रस्ता तयार केला आणि ते मशीन हृदयास जोडले. ही एक अत्यंत दुर्मिळ अशी समस्या होती. शस्त्रक्रियेतील मुख्य भाग पूर्ण होईपर्यंत रुग्णाचे हृदय २.५ तास बंद ठेवून सर्व शस्त्रक्रिया अतिशय वेगाने पार पाडण्यात आल्याचे डॉ. पांडा यांनी सांगितले.
२०११ मध्ये अलरियानी यांच्या महारोहिणीमध्ये म्हणजेच हृदयातून संपूर्ण शरीरास ऑक्सिजनयुक्त रक्ताचा पुरवठा करणाऱ्या सर्वात मोठ्या रक्तवाहिनीमध्ये बिघाड निर्माण झाला. त्या शस्त्रक्रियेमध्ये अलरियानी यांची फाटलेली महारोहिणी टाके घालुन पूर्ववत केली गेली. पण सातत्याने सुरू राहिलेल्या खोकल्याच्या आजारामुळे, हृदयापर्यंत पोहोचण्यासाठी छेद देण्यात आलेल्या चेस्ट वॉलवरचे टाके तुटले. पुढील काही दिवस वारंवार ओ.टी.मध्ये जाऊनही अलरियानी यांच्या महारोहिणीची अंशतः दुरूस्तीच केली गेली.
यामुळेच अलरियानी यांनी जानेवारी २०१२ मध्ये दक्षिण भारतातील एका प्रसिद्ध हृदयरोगविषयक रूग्णालयामध्ये जाऊन उपचार करून घेतले. तिथे, त्यांच्या महारोहिणीमध्ये तीन स्टेंट्स बसविण्यात आले. पण त्यानंतर मलेशिया येथे आपल्या मुलीकडे गेलेले असताना अलरियानी यांना पुन्हा छातीतील वेदनांचा त्रास होऊ लागला. तेथील डॉक्टरांनी सांगितले की हृदयातून एकसमान दिशेने रक्त वाहून नेण्याचे कार्य करणाऱ्या हृदयाच्या झडपांमध्येच छिद्र आहे. अशा परिस्थितीत अलरियानी यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यास नकार देऊन मलेशियामधील डॉक्टरांनी त्यांना एएचआयमध्ये जाण्यास सांगितले. एएचआयमध्ये हि शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याने अलरियानी म्हणतात, आता असं वाटतं की मी मृत्यूला अनेकदा चकवून आलो आहे.
एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये एकाचवेळेस पार पडलेल्या सहा शस्त्रक्रिया
1. रिडू स्टर्नोटोमीः या प्रक्रियेमध्ये, ब्रेस्टबोन म्हणजेच छातीच्या हाडास आधार देण्यासाठी एक वायर या हाडाभोवती गुंफली जाते.
2. माइट्रल व्हॉल्व्ह रिपेअरः फुफ्फुसातून हृदयाकडे सहज रक्तपुरवठा करण्याचे काम करणाऱ्या झडपेमधील छिद्र डॉक्टरांनी बंद केले. अशा छिद्रामुळे रक्त हृदयाकडे न जाता उलटे फुफ्फुसाकडे जाऊ शकते.
3. एओर्टिक व्हॉल्व्ह रिप्लेसमेंटः हृदयातून महारोहिणीकडे रक्त प्रवाहित करणारी झडप दुरूस्त न केल्यास त्यामुळे रूग्ण अत्यवस्थ होऊ शकतो.
4. अपेन्डॅगॅक्टोमीः हृदयातील दोन कप्पे, ज्यांमुळे चुकीचे संकेत मिळु शकतात आणि