नवी दिल्ली : २०१६ हे वर्ष अवकाश तंत्रज्ञान विश्वात भारतासाठी म्हणजे भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रोसाठी खुप महत्त्वाचे ठरणार आहे. दर महिन्याला एक अवकाश प्रक्षेपण गाठण्याएवढी क्षमता या वर्षात इस्त्रो प्राप्त करणार आहे. सर्वात म्हणजे भारताची स्वदेशी बनावटीची मिनी GPS यंत्रणा कार्यान्वित होणार आहे.
मगंळयान मोहीम यशस्वी झाल्यानं भारताचं अवकाश तंत्रज्ञानाच्या बाबातीत जागतिक पटलावर नाणं खणखणीत वाजलंय. त्यामुळे आणखी कुठला पराक्रम भारत करणार याची उत्सुकता जगभरात आहे. भारत 2016च्या सुरुवातीला पहिल्या तीन महिन्यात तीन संदेशवहनाचे उपग्रह पाठवणारेय.
भारतीय उपखंड हे कार्यक्षेत्र असणारी स्वदेशी बनावटीची मिनी जीपीएस सदृश यंत्रणा भारत विकसित करतोय. याआधी ४ उपग्रह भारतानं सोडले होते. उर्वरित ३ उपग्रह हे त्याचाच भाग असणारेय. त्यामुळे हे 7 उपग्रह भारतीय उपखंडात म्हणजेच भारत आणि भारताच्या बाहेर १५०० किमीपर्यंत व्यक्ति, वाहन किंवा जहाज यांचे अचुक स्थान सांगू शकणारेय. त्यामुळे भारतीय उपखंडातील कोट्यवधी लोकांना आता अमेरिकेच्या GPS ऐवजी भारताची मिनी जीपीएस यंत्रणा वापरण्याचा पर्याय या पुढच्या काळात उपलब्ध असेल.
इस्रो आता चांद्रयान २ महिमेची आखणी करतंय. यामध्ये एक फिरता रोबोट आपण चांद्रभूमीवर उतरवणारेय. तेव्हा या मोहिमेवर अखेरचा हात फिरवण्याचे काम याच वर्षी होणार आहे. कारण २०१७मध्ये चांद्रयान -२ मोहिम प्रत्यक्षात येणारेय.
इस्त्रो २०१६च्या वर्षा अखेरीस हनुमान उडी मारण्याचा प्रयत्न करणार आहे. यामध्ये GSLV - MK 3 या प्रक्षेपकाद्वारे ३.५ टन वजनाचा उपग्रह अवकाशात धाडणार आहोत. विशेष म्हणजे यामध्ये आपण स्वबळावर विकसित केलेले क्रायजेनिक इंजिन वापरणार आहोत. ही मोहीम जर यशस्वी झाली तर ४ टन म्हणजे ४ हजारो किलो वजनापर्यंतचे उपग्रह स्वबळावर सोडण्याची क्षमता आपण प्राप्त करणार आहोत. यामुळे असे वजनदार उपग्रह पाठवण्यासाठी परदेशांत जाण्याची, अवलंबून रहाण्याची गरज भासणार नाही. या मोहिमेमुळे आपण अवकाशात स्वबळावर अंतराळवीर पाठवण्याचा मार्गही मोकळा होणार आहे.
२०१६ या वर्षी समानवी म्हणजे अवकाशात अतंराळवीर पाठवण्यासाठी केंद्र सरकार इस्त्रोला परवानगी देईल अशी अपेक्षा आहे. तसंच २०१४ च्या सप्टेंबरपासून मंगळाभोवती भ्रमण करणा-या मंगळयानातून मिळालेली माहिती ही अभ्यासासाठी खुली होण्याची शक्यताय. त्यामुळे मंगळबाबातचा माहितीचा खजिना खुला होणारेय.
एवढंच नाही तर यावर्षीही आपण परदेशांचे काही उपग्रह अवकाशात पाठवणार आहोत. पृथ्वीचा छायाचित्राच्या माध्यमातून अभ्यास कऱणारा catrosat 2 हा अत्यंत आधुनिक उपग्रहही पाठवणार आहोत.
सूर्याचा अभ्यास करण्यासाठी इस्त्रो " आदित्य " नावाचा उपग्रह पाठवण्याबाबत गांभीर्याने विचार करतंय. या मोहिमेला यंदा केंद्राचा हिरवा कंदील मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.
थोडक्यात यंदाचे वर्ष इस्त्रोसाठी मोठ्या घडामोडींचे, उत्साह वाढवणारे आणि भविष्यातील मोहिमांचा पाया रचणारे असणारेय.