नवी दिल्ली : एक धक्कादायक माहिती समोर आली आहे, २०११ च्या गणनेनुसार ७५ हजार भिकारी बारावीपर्यंत शिक्षण घेतलेले आहेत. देशात तब्बल ३ लाख ७२ हजार भिकारी आहेत. विशेष म्हणजे त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सुशिक्षितांचा समावेश आहे.
पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्यांचाही यामध्ये समावेश आहे. शिक्षण घेऊनही चांगल्या नोकऱ्या न मिळाल्यानेच भीक मागण्याची वेळ आल्याचे अनेकांनी सांगितले आहे.
देशभरातील भिकाऱ्यांची संख्या नुकतीच जाहीर झाली आहे. देशातील ३ लाख ७२ हजार भिकाऱ्यांपैकी ७५ हजार बारावीपर्यंत शिकलेले आहेत, तर ३ हजार व्यावसायिक अभ्यासक्रमाचा डिप्लोमाही पूर्ण केला आहे.
लोकांवर पदवीनंतरही भीक मागण्याची वेळ येत असेल, तर देशातील बेरोजगारीची समस्या खूपच गंभीर असल्याचे समाजशास्त्रज्ञ गौरांग जानी यांनी नमूद केले आहे. एका सामाजिक संस्थेचे वीरेन जोशी यांनी सांगितले की, भीक मागून सहज पैसे मिळतात, या लालचेपोटीच भिकारी भीक मागणे सोडत नाहीत.
सरकारी नोकरीच्या प्रयत्नात खासगी नोकरीही गमावल्यामुळे दशरथ परमार यांचे कुटुंब अक्षरश: रस्त्यावर आले. गुजरात विद्यापीठातून एम.कॉम.ची पदवी मिळविलेले ५२ वर्षांचे दशरथ परमार मोफत अन्नछत्र देणाऱ्या संस्थांच्या भरवशावर आयुष्य ढकलत आहेत.
दिनेश उत्तम इंग्रजी बोलतात. मी गरीब आहे, पण इमानदार आहे. नोकरीच्या तुलनेत या धंद्यात जास्त पैसे मिळतात, म्हणून भीक मागतो.
एका रुग्णालयात वॉर्डबॉय म्हणून काम करणारे दिनेश खोधाबाई हे १२ वी पास असून ४२ वर्षे वय आहे. वॉर्डबॉय म्हणून काम करत असताना दिवसा १०० रुपये वेतन मिळायचे. मात्र आता मला दररोज २०० रुपये मिळत असल्याचे दिनेश म्हणतात.