नवी दिल्ली : अभिनेता आमिर खानने वादग्रस्त विधान केल्यानंतर देशात संतापाची लाट उसळली आहे. भाजपचे नेते आणि खासदार साक्षी महाराज हे आमिर खानवर भडकलेत. त्यांनी म्हटलेय आमिरची पत्नी किरण रावला तालिबानमध्ये राहायचे आहे का?
आमिरला जिथे शांती मिळेल तिथे जाऊन राहावे. जर त्याच्या पत्नीला देश सोडून दुसऱ्या देशात जायचे असेल आणि आमिरला तिचा सल्ला मान्य असेल तर त्याने खुशाल जावे, असा सल्ला भाजपने दिलाय. आमिरची पत्नी भारतात नाही तर तिला तालिबानमध्ये राहायचे आहे का? तिला भारतात नाही तर इराक, इराकमध्ये राहायचे आहे का? असहिष्णुताबाबतीत जे व्यक्तव्य केले आहे ते त्याचे शब्द असतील तर आमिरचे मन वाईट आहे. त्याच्यात सत्यपणा नाही. असे वाटते आमिर खान हा कटकारस्थानचा शिकारी झालाय, असे साक्षी म्हणालेत.
आमिरच्या सिनेमांनी करोडो रुपये कमावले आहेत. असे असताना त्यांने असे विधान करणे योग्य नाही. तसेच जगात भारत हे सर्वात सहनशील राष्ट्र म्हणून ओळखले जाते, असे साक्षी म्हणालेत.
दरम्यान, देशात असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे आणि मला त्याबाबत फार काळजी वाटते. मुलांच्या सुरक्षिततेबद्दल अतिशय चिंतेत असलेली माझी पत्नी किरणने तर मला आपण देश सोडून जाऊ या, असेही सांगितले होते, असे आमिरने दिल्लीतील रामनाथ गोयंका पुरस्कार सोहळ्यात बोलताना म्हटले होते. त्यावरून जोरदार आमिरचा निषेध व्यक्त केला जात आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.