नवी दिल्ली : सोशल मीडियाच्या माध्यमातून सेनेतील अधिकारी आणि जवान यांच्यातील धुसपूस आता चव्हाट्यावर येणं सुरू झालंय. अगोदर बीएसफ आणि नंतर सीआरपीएफच्या जवानांचा व्हिडिओ समोर आल्यानंतर आता आर्मीतील एक जवान यज्ञ प्रताप यांचा व्हिडिओही समोर आलाय.
यातून जवानांनी आपल्यावरील अत्याचाराला आणि सेनेतील अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार समोर आणण्यासाठी सोशल मीडियाला आपलं हत्यार बनवल्याचं दिसून येतंय.
या व्हिडिओत लान्स नायक यज्ञ प्रताप यांनी आपला अधिकाऱ्यांकडून छळ केला जात असल्याचा गंभीर आरोप केलाय. शिवाय, सेनेत जवानांना अनेक ठिकाणी अधिकाऱ्यांचे कपडे धुणं, बूट पॉलिश करणं, कुत्र्यांना फिरवायला घेऊन जाणं यांसारखी कामं करावी लागतात, असंही त्यांनी व्हिडिओत म्हटलंय. मिळालेल्या माहितीनुसार, यज्ञ प्रताप हे सध्या देहरादूनमध्ये तैनात आहेत.
यज्ञ प्रताप यांनी गेल्या वर्षी 15 जून रोजी राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना यासंबंधी एक पत्र धाडलं होतं. यामध्ये अधिकाऱ्यांकडून जवानांच्या शोषण होत असल्याची तक्रार त्यांनी केली होती. ही गोष्ट अधिकाऱ्यांना समजल्यानंतर त्यांनी यज्ञ प्रताप यांना प्रताडित केलं... इतकंच नाही तर यासाठी त्यांच्यावर कोर्ट मार्शलही होऊ शकतं. परंतु, आपण पंतप्रधानांना पत्र लिहून कोणत्याही नियमांचं उल्लंघन केलं नसल्याचं यज्ञ प्रताप यांनी म्हटलंय.