`केजरीवाल यांनी सिब्बलांविरोधात निवडणूक लढवावी`

अरविंद केजरीवाल यांच्याशी कोणतेही मतभेद नसल्याचं सांगतानाच केजरीवाल यांनी सिब्बलांविरोधात निवडणूक लढवली तर आपण त्यांना पाठिंबा देणार असल्याचंही अण्णांनी म्हटलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Oct 1, 2012, 05:07 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी आज अरविंद केजरीवालय यांची भेट घेतल्यानंतर एक पत्रकार परिषद घेतलीय. यावेळी अण्णांनी कपिल सिब्बल यांच्याविरोधात रणशिंगच फुंकलंय. यावेळी अरविंद केजरीवाल यांच्याशी कोणतेही मतभेद नसल्याचं सांगतानाच केजरीवाल यांनी सिब्बलांविरोधात निवडणूक लढवली तर आपण त्यांना पाठिंबा देणार असल्याचंही अण्णांनी म्हटलंय.
आज सकाळीच दिल्लीत अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांनी अण्णांची भेट घेतली होती. त्यानंतर ‘अण्णा जे काही करतील त्यामध्ये आम्ही त्यांच्यासोबत नेहमीच असू... प्रत्येक निर्णयात आम्ही अण्णांची साथ देणार...’असल्याचं केजरीवाल यांनी म्हटलं होतं. आता अण्णांनीही केजरीवाल यांच्याशी आपले मतभेद नसल्याचं सांगितलंय. केजरीवाल आणि माझे मार्ग वेगळे, ध्येय मात्र एकच असल्याचं अण्णांनी म्हटलंय. यावेळी पठारेंच्या राजीनाम्याचं कारण वैयक्तिक असल्याचंही अण्णांनी स्पष्ट केलंय. पण, कपिल सिब्बल यांना थेट टीकेचं लक्ष्य करत ‘केजरीवाल यांनी सिब्बलांविरोधात निवडणूक लढवावी, केजरीवाल यांनी स्वत: निवडणूक लढविल्यास आपण त्यांना पाठिंबा देऊन कपिल सिब्बल यांच्याविरोधात करणार प्रचार’ असं जाहीर वक्तव्य अण्णांनी केलंय. केजरीवाल यांचा राजकीय पक्ष इतर राजकीय पक्षांपेक्षा वेगळा पक्ष हवा... केजरीवाल यांचे उमेद्वार योग्य असल्यास त्यांनाही पाठिंबा देणार असल्याचं अण्णांनी यावेळी म्हटलंय.
यावेळी अण्णांनी आपल्या भावी टीमविषयी काही घोषणा केली नाही पण आंदोलनासाठी कोणतीही घाई नसल्याचं अण्णांनी म्हटलंय. आंदोलनाकडून अनेक लोकांना आशा आहे, या आंदोलनात त्यांनाही सामील व्हायचंय. पण, आम्ही सगळ्या लोकांना पडताळूनच टीममध्ये घेणार असल्याचं अण्णांनी यावेळी म्हटलंय. टीममध्ये सहभागी असणाऱ्या लोकांना ट्रेनिंगही देण्यात येणार आहे. ज्या लोकांना या टीममध्ये सामील व्हायचंय त्यांचा पूर्वेतिहासही जाणून घेण्यात येणार आहे. अनेक माजी अधिकाऱ्यांना टीम अण्णामध्ये सहभागी होण्याची इच्छा असल्याचं अण्णांनी म्हटलंय.