www.24taas.com, वृत्तसंस्था, हैदराबाद
संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या दिल्ली बलात्काराच्या घटनेची हैदराबादला पुनरावृत्ती झालीय. एका प्रायव्हेट कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करणाऱ्या तरुणीवर चालत्या टॅक्सीमध्ये बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडलीय. त्यामुळं देशातल्या प्रमुख शहरामधल्या महिला सुरक्षित नसल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालंय.
हैदराबादमधील सायराबाद इथं एका कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करणारी तरुणी गुरूवारी सायंकाळी साडे सातच्या सुमारास काम संपल्यानंतर हॉस्टेलवर जाण्यासाठी बसस्टॉपवर उभी होती. बसची वाट पाहत असतानाच खाजगी टॅक्सीचालकानं कुठं जायचंय विचारलं, ५० रूपये भाडं लागेल हे सुद्धा सांगितलं.
शेअर टॅक्सी असल्याचं वाटून तरुणी ४० रुपये देऊ म्हणत टॅक्सीत बसली. टॅक्सीमध्ये आधीच दोन तरुण बसलेले होते. टॅक्सी चालकानं टॅक्सी भलतीचकडे वळवली असता त्यात बसलेल्या तरुणांनी तिच्यावर गाडीतच बलात्कार केला. साडेसातपासून ते रात्री पावणे दोनपर्यंत या नराधमांनी तिला टॅक्सीतून फिरवलं. त्यानंतर तिला तशाच अवस्थेत हॉस्टेलच्या बाहेर सोडलं.
भरधाव वेगानं टॅक्सी चालू असताना पीडित तरूणीनं बंगळूरूमध्ये राहणाऱ्या आपल्या बॉयफ्रेंडला फोन करण्याचा प्रयत्न केला पण त्या नराधमांनी तिचा फोन हिसकावून घेतला. पीडित तरूणीच्या बॉयफ्रेंडला शंका आल्यानं त्यानं हैदराबादमधील आपल्या मित्राला सर्व प्रकार सांगितला आणि पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यास सांगितलं.
पोलिसांनी हॉस्टेलमध्ये येवून पीडित तरूणीकडे यासंबंधी विचारणा केली, मात्र पीडित तरूणी घाबरलेली असल्यानं तिनं आपलं दोन जणांनी अपहरण केलं होतं आणि त्यानंतर त्यांनी आपल्याला हॉस्टेलबाहेर सोडलं असं सांगितलं. पोलिसांना शंका आल्यानं त्यांनी तिला विश्वासात घेवून विचारल्यानंतर त्या तरूणीनी झालेला सर्व प्रकार सांगितला.
पीडित तरूणीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. तसंच घटना स्थळावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीनं वापर केलेल्या कारचा शोध लावत आरोपीला अटक केली. दिल्ली बलात्कारातील आरोपीला कठोर शिक्षा मिळाली आहे, असं असतानाही तुमचं असं कृत्य करण्याची हिंमत कशी काय झाली असा प्रश्न पोलिसांनी आरोपीला विचारताच ते म्हणाले की पीडित तरूणी याची कुठे वाच्यता करणार नाही अशी आम्हाला खात्री होती. एकूणच काय तर दिल्ली बलात्कारातील आरोपींना फाशीची शिक्षा होऊन देखील देशातील महिला अजून सुरक्षित दिसत नाहीयेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.