www.24taas.com, झी मीडिया, नई दिल्ली
अरुणाचल प्रदेशचे काँग्रेस नेत्याच्या मुलाची दिल्लीत हत्या झालीय. या हत्येच्या मॅजिस्ट्रेट तपासाचे आदेश दिल्ली पोलिसांनी दिले आहेत. नीडो तनियम या तरुणाला दक्षिण दिल्लीतल्या लाजपतनगर भागात बुधवारी काही दुकानदारांनी मारहाण केली होती, त्यानंतर त्याचा मृत्यू झाला.
काँग्रेसचे आमदार आणि आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाचे संसदीय सचिव नीडो पवित्रा यांचा मुलगा नीडो तनियम हेअर स्टाईलवरुन काही दुकानदारांनी टोमणा मारला,त्यानंतर झालेल्या भांडणात त्याला दुकानदारांकडून मारहाण करण्यात आली. गुरूवारी तनियमचा मृत्यू झाला.
घटनेचा निषेध करत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी प्रकरणाची मॅजिस्ट्रेट चौकशी करण्याचे आदेश दिलेत. राज्यपालांनीही त्याला मंजूरी दिल्याचं कळतंय. अशाप्रकारच्या घटना सहन केल्या जाणार नाही, असं केजरीवाल म्हणाले.
नीडो आणि एका दुकानदारची बुधवारी वादावादी झाली. प्रांतवाद आणि वर्णद्वेषातून हा प्रकार घडल्याचं सांगण्यात येतंय. या वादानंतर आमदार पुत्राला पोलीस घेऊन गेले होते. मात्र नीडो परत दुकानासमोर आल्यानंतर, दुकानदार आणि त्याच्या साथीदारांनी, नीडोला बेदम मारहाण केली. यामध्ये जबर जखमी झालेल्या नीडोचा मृत्यू झाला.
दरम्यान, आम आदमी पक्षाचे नेते दिलीप पांडे यांनी याप्रकाराचं खापर पोलिसांवर फोडलं आहे. पोलिसांच्या बेजाबदारपणामुळंच ही हत्या झाल्याचं पांडेंनी म्हटलं आहे.
तर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार विद्यार्थ्याच्या पोस्टमार्टम रिपोर्टनुसार त्याच्या शरीरावर बाहेरील जखमा दिसत नाहीयेत. मृत्यूच्या कारणांचा तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.