नवी दिल्ली : पासपोर्टसाठी अर्ज करताना आपल्या जैविक वडिलांचेच (बायोलॉजिकल फादर) नाव आपल्या अर्जात देणे आता बंधनकारक असणार नाही. आपल्या सावत्र वडिलांचे नाव दिल्यास ते सुद्धा आता ग्राह्य धरले जाईल. दिल्ली उच्च न्यायालयाने एका महिलेच्या याचिकेवर सुनावणी करताना हा निर्णय दिलाय.
या महिलेने पासपोर्ट बनवण्याच्या अर्जात आपल्या सावत्र वडिलांचे नाव लिहिले होते. परंतु, तिच्या जन्म दाखल्यावर मात्र तिच्या जैविक वडिलांचे नाव होते. यावर पासपोर्ट ऑफिसातील अधिकाऱ्यांनी आक्षेप घेऊन पासपोर्ट देण्यास नकार दिला.
या महिलेने मग दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागितली. यानंतर न्यायालयाने संबंधित महिलेला चार महिन्यांतच तिच्या सावत्र वडिलांच्या नावे पासपोर्ट दिला जावा, असे आदेश दिले.
'केवळ जैविक वडील असणे म्हणजे म्हणजे आई- बाबा असण्याचा अधिकार असतो असे नाही. रक्ताच्या नात्याने बाप असलेल्या पुरुषाने जर आपल्या पत्नीची जबाबदारी घेतली नाही, तर अशा महिलेस दुसऱ्या कुटुंबाला आपलसं करायचं असेल तर तिला रोखलं जाऊ शकत नाही' असं न्यायालयानं म्हटलंय.
महिलेच्या म्हणण्यानुसार तिचे आई वडील वेगळे झाल्यावर तिचा जन्म झाला होता. त्यामुळे तिला तिच्या खऱ्या वडिलांचे नाव पासपोर्टवर येऊ द्यायचे नव्हते. तिचे खरे वडील हयात आहेत की नाही, याचीही तिला खात्री नव्हती.
पण, पासपोर्ट अधिकाऱ्यांनी मात्र, पासपोर्ट मॅन्युअल २०१० अनुसार जोपर्यंत जैविक वडील हयात आहेत, तोपर्यंत अर्जदाराच्या सावत्र वडिलांचे नाव पासपोर्टवर लिहिता येत नाही, असं सांगत तिला पासपोर्ट देण्यास नकार दिला होता.