www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
गर्भवती, वयस्क महिलांना यापुढे रेल्वेमध्ये लोअर बर्थ देण्यात येणार आहे. यामुळे वयस्क, गर्भवती महिलांचा रेल्वेप्रवास आता अधिक सुखकर होणार आहे. त्यादृष्टीने आरक्षण फॉर्ममध्ये नोंदणी करण्यासाठी या अर्जामध्ये बदल करण्यात येत आहे. आरक्षित श्रेणीमध्ये कोणत्याही परिस्थितीत अशा महिलांना लोअर बर्थ देण्यात येणार आहे.
रेल्वेचे आरक्षण करताना आतापर्यंत त्यात केवळ डॉक्टर आणि ज्येष्ठ नागरिक अशांसाठी रकाना ठेवण्यात आला होता. त्यामुळे महिलांना विशेषत: गर्भवती महिलांना जर वरचे बर्थ मिळाले, तर त्यांना ते खूपच त्रासदायक होत होते. हे लक्षात घेऊन रेल्वेने त्यांना सुविधा देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
याशिवाय ४५ वर्षांवरील सर्व महिलांना लोअर बर्थ देण्यात येणार आहे. याबाबत मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी वाय. के. सिंह यांनी सांगितले, रेल्वे बोर्डाने आरक्षण फॉर्ममध्ये बदल केला आहे.
आता नव्या फॉर्ममध्ये आणखी एक रकाना केला असून, त्यात महिला गर्भवती असल्याचे चिन्ह दाखविण्यात येणार आहे. या फॉर्मबरोबर आरक्षण करताना त्यांना मेडिकल सर्टिफिकेट द्यावे लागणार आहे. याशिवाय तिकीट प्रतीक्षा यादीत असेल, तरीही त्यांना लोअर बर्थ दिले जाणार आहे.
गर्भवती महिलांसमवेत एक व्यक्ती असणे आवश्यक आहे. हे नवीन फॉर्म लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्ष हर्षा शहा यांनी सांगितले, रेल्वेची ही योजना खूपच चांगली असून, ही योजना यापूर्वीच सुरू होण्याची आवश्यकता होती.
आरक्षण फॉर्मच्या प्रारूपातही बदल करण्यात आला आहे. नव्या फॉर्मवर प्रवाशांना दोन ठिकाणी मोबाईल नंबर लिहावे लागणार आहे. एक क्रमांक हा घरच्या पत्तासमवेत द्यावा लागणार आहे. जो यापूर्वीही प्रवासी लिहीत आले आहेत.
याशिवाय अलर्ट एसएमएस सुविधासाठी दुसरा ठिकाणी मोबाईल नंबर लिहावा लागणार आहे. त्यात रेल्वे नंबर, श्रेणी, प्रवास कोठून सुरू होणार हे लिहावे लागणार आहे. तिकीट आरक्षित झाल्यावर प्रवाशांना त्या नंबरवर एसएमएस पाठविला जाणार आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.