`कोहिनूर विसरा... परत मिळणार नाही`

‘कोहिनूर’ हिरा ‘पाहायचा असेल तर ब्रिटनमध्ये येऊन म्युझियममध्ये पाहा... पण तो भारताला कदापि मिळणार नाही’ असं ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमरून यांनी म्हटलंय.

Updated: Feb 22, 2013, 01:52 PM IST

www.24taas.com, अमृतसर
एकेकाळी भारताची शान समजला जाणारा मौलिक असा ‘कोहिनूर’ हिरा ‘पाहायचा असेल तर ब्रिटनमध्ये येऊन म्युझियममध्ये पाहा... पण तो भारताला कदापि मिळणार नाही’ असं ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमरून यांनी म्हटलंय. भारताचा तीन दिवसांचा दौरा संपवून मायदेशी रवाना होण्यापूर्वी पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
जालियनवाला बाग हत्याकांड लाजिरवाणं असल्याचं एका ब्रिटन पंतप्रधानानं काल पहिल्यांदाच म्हटलं होतं. त्यामुळे भारतीयांच्या मनात निर्माण झालेली थोडीफार जवळीक कोहीनूर हिऱ्याबद्दल केलेल्या वक्तव्यानं मात्र पुन्हा दूर झालीय.

कोहिनूरचा इतिहास
पूर्वी हा हिरा ‘श्यामकांत’ नावानेही ओळखला जायचा. १८ व्या शतकात नादिरशहा दिल्लीच्या तख्तावर आल्यानंतर हा हिरा त्याच्या ताब्यात आला व त्याने त्याचे नामकरण ‘कोहिनूर’ (तेजाचा पर्वत) असे केले. १८५० साली हा कोहिनूर मुगल सम्राट शहाजहानच्या मयूर सिंहासनातही जडविलेला होता. १८५० मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने पंजाबच्या दुलिपसिंह या शासकाकडून तो जप्त केला व तेव्हाच्या ब्रिटिश गव्हर्नर जनरलने तो लंडन सरकारला भेट म्हणून पाठविला. १८५८ मध्ये भारताचे शासन कंपनी सरकारकडून ब्रिटिश राज घराण्याकडे गेल्यावर ब्रिटनच्या तेव्हाच्या सम्राज्ञी व्हिक्टोरिया यांच्या राजमुकुटात कोहिनूर दर्शनी भागात जडवला गेला.
१०५ कॅरेटच्या व २१.६ ग्रॅम वजनाच्या कोहिनूर हिर्यांची गणना जगातील सर्वात मोठय़ा असली मौल्यवान हिर्यां मध्ये होते. एक हजाराहूनही अधिक वर्षांपूर्वी आंध्रातील खाणीत सापडलेला हा हिरा वेळोवेळी झालेल्या युद्धांमध्ये लुटला गेला व त्या त्या वेळच्या हिंदू, राजपूत, मुगल, इराणी, शीख, अफगाण व ब्रिटिश अशा शासकांच्या/ जेत्यांच्या तिजोरीत जमा झाला. सध्या हा हिरा टॉवर ऑफ लंडनमधील वस्तु संग्रहालयात ठेवलेला असून शाही समारंभांत ब्रिटिश महाराणी कोहिनुरी मुकुट परिधान करतात.