www.24taas.com , वृत्तसंस्था, नवी दिल्ली
विवाहातील सर्वात महत्त्वाचा घटक हा शरीरसंबंध आहे, जर विवाहानंतर पत्नीने शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिला तर पतीला पत्नीकडे घटस्फोट मागता येऊ शकेल, असा ऐतिहासिक निकाल दिल्ली हायकोर्टाने दिला आहे.
एका दाम्पत्त्याच्या घटस्फोटाला दिल्लीतील कौटुंबिक न्यायालयाने मंजुरी दिली होती. कौटुंबिक न्यायालयाच्या या निर्णयाला पत्नीने दिल्ली हायकोर्टात आव्हान दिले होते. हायकोर्टाने या प्रकरणावर नुकताच निकाल दिला आहे.
गेल्या आठ ते नऊ वर्षांपासून पत्नीने शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्याने घटस्फोट द्यावा असा युक्तिवाद पतीच्या वतीने हायकोर्टात करण्यात आला होता. कोर्टाने हा युक्तिवाद ग्राह्य धरून घटस्फोटाला मंजुरी देण्याचा कनिष्ठ कोर्टाचा निर्णय कायम ठेवला. न्यायालयाने निकालपत्रात `शारिरीक जवळीक हा विवाहातील महत्त्वाचा घटक असून पत्नीने शरीरसंबंधांना नकार देणे म्हणजे विवाहाच्या मूळ संकल्पनेवरच घाला आहे` असे मत नोंदवले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.