नवी दिल्ली : केंद्र सरकारनं ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांची राष्ट्रीय संशोधन प्राध्यापक या प्रतिष्ठेच्या पदावर फेरनियुक्ती केली आहे. भारत सरकारनं नॅशनल रिसर्च प्रोफेसरशीप ही योजना, 1949 मध्ये कार्यान्वित केली होती.
विविध ज्ञानशाखांचे प्राध्यापक आणि विद्वानांनी दिलेल्या योगदानाचा यथोचित गौरव करणं, हा या नॅशनल रिसर्च प्रोफेसरशीप योजनेचा मुख्य उद्देश आहे.
वयाची 65 वर्षं पूर्ण केलेले, तसंच आपल्या क्षेत्रात विशेष उल्लेखनीय योगदान देणा-या, तसंच वर्तमानस्थितीतही संबंधित क्षेत्रात कार्यरत असणा-यांचीच, मानाच्या नॅशनल रिसर्च प्रोफेसर म्हणून नियुक्ती केली जाते.
डॉक्टर माशेलकर यांची या पदी फेरनियुक्ती झाल्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय.